एक्स्प्लोर
जागा नसल्याने पंढरीत मृतदेह 6 दिवस पोत्यात भरुन
पंढरपूर : पंढरीच्या पांडुरंगाला अनाथांचा नाथ म्हणतात. त्यामुळेच वर्षानुवर्षे लाखो भाविक पंढरपुरी येऊन देवाच्या हवाल्यावर वृद्ध, अपंगांना त्यांचे कुटुंबीय सोडून जातात. पुण्यभूमीत मृत्यू आल्यास मोक्षप्राप्ती होते, या भावनेतून येथे येऊन राहणाऱ्यांना या नगरीची काळी बाजू समोर आणणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात 16 जून रोजी एका बेवारस मृतदेहाची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी पंचनामा करुन हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याच दिवशी शवविच्छेदनही झालं. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते कृष्ण वाघमारे रुग्णालयात गेले असता त्यांना अतिशय दुर्गंधी जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी तपास करण्याचा प्रयत्न केला असता शवविच्छेदन विभागातील मागील बाजूस एका पत्र्याच्या गाड्यावरील पोत्यातून ही दुर्गंधी येत असल्याचं दिसून आलं.
16 जून रोजी पोस्टमार्टम केलेलं हे प्रेत एका पोत्यात भरुन मागील गाड्यात उघड्यावर टाकून देण्यात आलं होतं. हे प्रेत तसंच दोन-तीन दिवस ऊन आणि पावसात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत पडून होतं. ज्याला वारकरी मोक्ष समजतात त्याच ठिकाणी या प्रेताचा मात्र नरकवास सुरु होता.
माध्यमात ही बातमी पोहचल्याने सर्वच विभाग धावपळ सुरु झाली आणि अखेर या प्रेताच्या नरकयातना संपवून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृतदेहाच्या या संतापजनक विटंबनेच्या प्रकारानंतर आता प्रत्येक विभाग आपली जबाबदारी ढकलू लागला आहे. उपजिल्हा रुग्णालय अधीक्षकांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.
पंढरपूरमध्ये अशा मोक्षाच्या आशेवर अनेक वृद्ध येत असतात आणि त्यांना अशा बेवारस अवस्थेत मृत्यूला सामोरे जावे लागते. दरवर्षी जवळपास असे 55 ते 60 बेवारस मृतदेह शहरात आढळून येतात. पोलीस पंचनामा करुन पोस्टमार्टमला पाठवतात.
मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी 2 ते 3 दिवस हा मृतदेह जपून ठेवणे अपेक्षित असतं. मात्र कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या येथील जिल्हा रुग्णालयात शवागर असूनही प्रेत ठेवण्याची व्यवस्थाच सुरु केलेली नाही.
नगरपालिकेकडे शववाहिकाच नसल्याने मिळेल त्या हातगाड्यावर हे प्रेत वाहून आणले जाते. पोस्टमार्टम केल्यावर प्रत्येक प्रेत असे बाहेर पोत्यात भरुन टाकले जाते का, अशी शंका आता समोर येऊ लागली आहे. रुग्णालय प्रशासनाने मात्र ही प्रेतं शवविच्छेदनगृहातच ठेवत असल्याचं सांगितलं आहे. या बेवारस मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी नगरपालिकेची असली तरी तेही काम पोलिसांना निधी उभा करुन करावे लागत आहे.
उपजिल्हा रुग्णालयात सध्या 33 जागा रिक्त असून सर्व सुविधा असूनही तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने या मशिनरींचा वापरच होत नाही. जिवंतपणी मृत्यूच्या दारात आल्याचा अनुभव अनेक जण बोलून दाखवतात. पण मृत्यूनंतरही विटंबना संपत नाही.
आषाढीच्या तोंडावर हा मृतदेह विटंबनेचा प्रकार उघड झाल्याने शासन कामचलाऊ चौकशी समिती नेमेलसुद्धा, पण यापेक्षा इथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी गरजेनुसार डॉक्टर्स नेमून सर्व सुविधा पुरवल्यास भाविकांवर ही वेळच येणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement