Pandharpur Assembly By-election 2021 | पोटनिवडणुकीत उमेदवार निश्चितीसाठी राष्ट्रवादीचे बडे नेते पंढरपूर दौऱ्यावर
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार निश्चितीसाठी अजित पवार, जयंत पाटील उद्या पंढरपूर दौऱ्यावर, भगीरथ भालके यांची उमेदवारी निश्चित?
पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित करण्यासाठी उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके अथवा पुत्र भगीरथ भालके यांच्यापैकी एक नाव निश्चित केले जाणार असल्याची शक्यता आहे. भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडून एका गटाने भालके परिवारात उमेदवारी देण्यास विरोध केल्याने अजित पवार याना पंढरपूरला यावे लागले आहे.
पंढरपूरची निवडणूक 17 एप्रिल रोजी होणार असून 23 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. सध्या राष्ट्रवादीकडे उमेदवार मागणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी दिवंगत आमदार भारत भालके यांच्याबाबत गोरगरीब मतदारांत असलेली सहानुभूतीचा विचार करता राष्ट्रवादीकडून भालके यांच्या परिवारातच उमेदवारी देण्याची मानसिकता दिसत आहे. त्यानुसार पक्षाकडून भालके यांच्या पत्नी जयश्रीताई यांचे नाव नक्की करण्याची तयारी सुरु असताना भालके समर्थकांना मात्र त्याजागी भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा आहे.
भालके यांच्या पत्नी राजकारणापासून कायमच दूर राहत त्यांनी कुटुंबाकडे आजवर जास्त लक्ष दिले होते. अशावेळी त्यांना उमेदवारी दिल्यास पराभवाची भीती भालके समर्थकांना वाटते. याउलट भगीरथ भालके यांची नुकतीच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदावर निवड झाल्यापासून त्यांनी मंगळवेढा व पंढरपूर या दोन्ही तालुक्यात गावभेटी करून वातावरण तयार केले आहे. मतदारसंघाचा पहिला दौराही त्यांचा आत्तापर्यंत पूर्ण झाल्याने भगीरथ यांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादीला चांगला विजय मिळेल अशी भालके समर्थकांची भूमिका आहे.
समाधान अवताडे देखील रिंगणात
यातच गेल्या दोन निवडणूक लढवत पन्नास हजारांपेक्षा जास्त मते मिळविणारे उद्योगपती समाधान अवताडे यांचेही नाव राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी चर्चिले जात असून भालके यांच्या निधनानंतर त्यांनीही संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही त्यांना मंगळवेढा व पंढरपूरातून मतदारांनी मोठा प्रतिसाद दिल्याने अजित पवार यांचे समोर हाही पर्याय असणार आहे. उद्या अजित पवार सकाळी कार्यकर्त्यांशी चर्चा करून मतदारसंघाचा आढावा घेतील आणि मग मुंबईवरून पक्षाची उमेदवारी जाहीर होईल. सध्या तरी राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी भालके यांचे पुत्र भगीरथ आणि त्यांच्या पत्नी जयश्रीताई हि दोनच नावे जास्त चर्चेत आहेत.