बाळूमामांच्या नावावर काही मंडळी पैसे गोळा करत असल्याने निषेधाचा ठराव, भक्तांमध्ये बेबनाव, काय आहे प्रकरण
लोकसंत अशी ओळख असलेले बाळूमामा (Balu Mama) यांच्या भक्तात सध्या चांगलाच बेबनाव सुरु झाला असून बाळूमामांच्या नावावर काही मंडळी पैसे गोळा करीत असल्याने त्यांच्या निषेधाचा ठराव अदमापूर गावाने केला आहे.
पंढरपूर : लोकसंत अशी ओळख असलेले बाळूमामा यांच्या भक्तात सध्या चांगलाच बेबनाव सुरु झाला असून बाळूमामांच्या नावावर काही मंडळी पैसे गोळा करीत असल्याने त्यांच्या निषेधाचा ठराव बाळूमामांचे समाधिस्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील अदमापूर या गावाने केला आहे. बाळूमामा यांच्या जीवनावरील मालिका सध्या टीव्हीवर जोरात सुरु असल्याने बाळूमामा यांच्याबाबत मोठी उत्सुकता सर्वसामान्य भक्तांमध्ये निर्माण होत आहे.
बेळगाव जवळील चिक्कोडी येथे सर्वसामान्य धनगर कुटुंबात 3 ऑक्टोबर 1892 साली जन्मलेले बाळूमामा अध्यात्मिक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करून संतश्रेष्ठ बनले. अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा यापासून समाजाला दूर ठेवण्याचे कार्य करताना बाळूमामा यांनी अनेक चमत्कार केले. आयुष्यभर घराचा संसार सोडून बाळूमामा यांनी गोरगरिबांचे दुःख दूर करण्याचे काम केले होते. अशा या संतश्रेष्ठ बाळूमामा यांनी 4 सप्टेंबर 1966 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अदमापूर येथे आपला देह ठेवला होता.
आता याच अदमापूरच्या सद्गुरू श्री बाळूमामा देवस्थान असलेल्या अदमापूर ग्रामपंचायतीने बाळूमामांच्या नावाने भक्तांना लुट करणाऱ्यांच्या निषेधाचा ठराव केल्याने खळबळ उडाली आहे. पंढरीचा पांडुरंग हे बाळूमामांचे आराध्य दैवत आणि याच ठिकाणी अदमापूर संस्थांच्या वतीने नवीन मठाचे उद्घाटन सोहळा पार पडला. याठिकाणी देवस्थानाचे कार्याध्यक्ष राजाराम मुदगल यांनी मामांच्या नावाने अनेकजण मेंढ्या आणि पालख्या नेट असल्याचा दावा करीत अशा लोकांच्या बाबतीत आता संस्थान गांभीर्याने कारवाईचा विचार करीत असल्याचे सांगितले. बाळूमामा देवस्थानकडे 20 ते 22 हजार मेंढ्या असून 16 खांडव्यात या राज्यभर फिरत असतात. कोणत्याही कामासाठी भक्तांकडून पैसे घेण्यास बाळूमामांचा विरोध होता त्यामुळे भक्तांकडून पैसे घेऊन फसवणूक करणे चुकीचे असल्याचे मुदगल सांगतात . तर अदमापूर गावाचे सरपंच यांनी करमाळा तालुक्यातील उंदरागाव येथील मनोहरमामा भोसले यांचेवर थेट आरोप केले आहेत .
बाळूमामांच्या अंगाखांद्यावर खेळलेले 80 वर्षाचे भिकाजी शिनगारे यांनीही बाळूमामांच्या नावाने पैसे गोळा केल्यास मामा त्याच्या घरादारावर खराटा फिरवत असा इशारा दिला. अदमापूर देवस्थान आणि ग्रामस्थ यांनी ज्यांच्यावर थेट आरोप केले ते मनोहरमामा भोसले यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत ना मी बाळूमामा यांचा वंशज आहे ना मी त्यांचा शिष्य आहे, मी तर त्यांचा भक्त असून त्यांच्या विचाराचा प्रसार करीत असल्याचे सांगितले आहे.
करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे अतिशय दुर्गम ठिकाणी मनोहरमामा यांनी आपला मठ सुरु केला असून सध्या त्यांची लोकप्रियता वाढू लागल्यानेच या वादाला सुरुवात झाल्याचे मानले जाते. अवघ्या 28 वर्षाचे मनोहरमामा हे सध्या अध्यात्मिक गुरु म्हणून नावारूपाला येऊ लागल्याने अनेक दिग्गज राजकीय नेते, सेलिब्रेटी हे मामांच्या भेटीसाठी धडपडताना दिसत असतात . अनेक राजकीय बडे नेते देखील वाट वाकडी करून उंदरगावकडे येत असतात. बाळूमामा यांच्या जीवनावरील मालिकेला मार्गदर्शन या मनोहरमामा यांनी केल्यानंतर त्यांचा दरबार हा चर्चेचा विषय ठरू लागला होता.
अतिशय आलिशान गाड्यातून बडी मंडळी उंदरगावात अमावास्येला पोहोचत असल्याने अदमापूर सोबत मनोहरमामा यांच्याकडेही गर्दी वाढू लागली आहे. कोणताही गंडादोरा , नारळ , नवस असला प्रकार नसलेल्या मनोहरमामा यांच्या मठात यामुळेच पुणे, मुंबई भागात या मठाची चर्चा वाढू लागली आहे. मी नाशिक विद्यापीठातून ज्योतिषाचार्य ही पदवी घेतली आहे. मी जे सांगतो , बोलतो त्याची प्रचिती राजकीय , कला , क्रीडा यासह सर्वच क्षेत्रातील मंडळींना येत असल्याने त्यांची गर्दी वाढू लागल्याचे मनोहरमामा सांगतात. आपण विठुराया आणि बाळूमामांचे भक्त असून येथे फक्त त्यांचे विचार सांगायचे काम आपण करीत असल्याने आपण बाळूमामांच्या नावाचे कुठेही दुरुपयोग करीत नसल्याचे मनोहर मामा सांगतात. मनोहर मामांच्या सांगण्यानुसार ते स्वतः एकही रुपया कोणाकडून घेत नसून सर्व देणग्या या त्यांच्या शिवसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट कडे येतात आणि यातून समाजोपयोगी कामे केली जात असल्याचा दावा करतात . नुकत्याच कोकणात आलेल्या पुरानंतर पूर ग्रस्तांना 12 ट्रक धान्य पाठवले तर कोरोना काळात 3500 रक्ताच्या बाटल्या भक्तांनी दिल्याचे मामा सांगतात.तर मनोहरमामा यांच्या मठात आल्याने आमचे समाधान झाल्याचे पुण्याचे भक्त अतुल म्हस्के आणि राहुल घुले यांचे सांगणे आहे .
एकंदर सध्या मनोहरमामा यांचे नाव राजकीय क्षेत्र आणि बडे सेलिब्रिटी यात जास्तच चर्चिले जाऊ लागल्याने हे मामा अध्यात्मिक गुरु तर बनणार नाहीत ना? ही भीती काही जणांना सतावत आहे तर काही जणांना बाळूमामांच्या नावाचे दुसरे स्थान निर्माण होऊ नये याची काळजी पडली आहे. ज्या बाळूमामा यांनी आयुष्यभर फक्त लोकांसाठी जीवन व्यतीत केले, आज त्यांचे भक्तात सुरु झालेला बेबनाव हा ना बाळूमामा यांना रुचणारा आहे ना त्यांच्या लाखो भक्तांना.. त्यामुळे वाद निर्माण करण्यापेक्षा मामांच्या विचाराचा समाज घडविण्याचे काम करावे अशीच बाळूमामांच्या भक्तांची अपेक्षा असणार...