(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Majha Katta : संशोधनातून विंचवाची नांगी ठेचणारे डॉक्टर हिम्मतराव बाविस्कर माझा कट्ट्यावर
Dr Himmatrao Bavaskar : वैद्यकीय पेशामध्ये मोठ-मोठ्या शहरात गेल्यानंतर उत्पन्न जोरदार मिळते. पण असेही काही डॉक्टर असतात ते कोणत्याही पैशाचा विचार न करता संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेला समर्पित करतात.
Dr Himmatrao Bavaskar : वैद्यकीय पेशामध्ये मोठ-मोठ्या शहरात गेल्यानंतर उत्पन्न जोरदार मिळते. पण असेही काही डॉक्टर असतात ते कोणत्याही पैशाचा विचार न करता संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेला समर्पित करतात. असंच एक नाव म्हणजे डॉक्टर हिम्मतराव बाविस्कर (Dr. Himmatrao Bawaskar)होय. नुकताच त्यांना पद्मश्री (Padma Shri) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डॉक्टर हिम्मतराव बाविस्कर यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. या मुलाखतीदरम्यान हिम्मतराव बाविस्कर यांनी आपल्या आयुष्यातील चढउतारावर भाष्य केलं. हिम्मतराव बाविस्कर यांचा संघर्ष डोळ्यात पाणी आणणारा आहे. तसेच आज हिम्मतराव बाविस्कर यांचे व्यक्तीमत्व अनेक तरुणांना आदर्शवत आहे. त्यांनी ज्या कठीण परिस्थितीतून शिक्षण घेतलं ते सर्वांसमोर एक आदर्श आहे.
डॉक्टर हिम्मतराव बाविस्कर यांचा जन्म मराठवाड्यातील अत्यंत गरीब कुटुंबात झाला होता. देहेड या खेडेगावात 3 मार्च 1951 रोजी हिम्मतराव यांचा जन्म झाला होता. लहानपनापासूनच हिम्मतराव यांना संघर्ष करावा लागला. हिम्मतराव यांनी लाकूडतोड, हॉटेलात कपबशा धुणे यांसह अनेक प्रकारचे काम करत आपलं शालेय शिक्षण पूर्ण केले. वडील फारसे शिकलेले नसले तरी आपल्या मुलांनी भरपूर शिकावं अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळेच मस्करीने त्यांना बॅरिस्टर म्हटलं जात होतं. पण हिम्मतरावांनी आत्मचरित्र लिहिलं आणि त्याचं नाव 'बॅरिस्टरचं कार्टं' असंच ठेवलं.
इंटरसायन्समधील यशानंतर हिम्मतराव यांनी नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या शिक्षणात प्रा. के. डी. शर्मा यांनी दिलेला 'पॅथॉलॉजी इज द मदर ऑफ मेडिकल सायन्स' हा गुरूमंत्र हिम्मतराव कोळून प्यायले. त्यानंतर 23 ऑगस्ट 1976 रोजी महाडजवळच्या घनदाट अरण्यातील बिरवाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हिम्मतराव यांची नियुक्ती झाली. यावेळी तेथील कंपाऊंडरच्या दहा वर्षाच्या मुलाचा विंचू चावल्याने मृत्यू झाला. तेव्हापासूनच हिम्मतराव बाविस्कर यांनी विंचू दंशावर संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यांनी खूप अभ्यास केला. या भागात विंचूदंशामुळे लोक दगावताहेत, हे समजल्यावर त्यांनी त्यांची कारणे, त्याचे परिणाम यांचा सखोल अभ्यास केला. रात्रदिवंस अभ्यास करत विंचूदंशाच्या 51 प्रकरणांवर हिम्मतराव बाविस्कर यांनी अडीच पानी शोधनिबंध तयार केला. लॅन्सेटने तो प्रकाशित केला. यानंतर औंध येथे राहून त्यांनी एमडी केले. विंचूदंशाची पार्श्वभूमी डोळ्यापुढे ठेवून वैद्यकीय संदर्भग्रंथांचे वाचन केले. विंचूदंशावर परिणामकारक औषध कोणते, यावर त्यांनी संशोधन केले अन् लस शोधली.
हिम्मतराव बाविस्कर यांनी आपल्या 40 वर्षाच्या वैद्यकीय क्षेत्रात अनेक चांगली कार्य केली. त्यांच्यामुळे अनेक गरीबांना फायदा झालाय. शालेय आयुष्यापासूनच अभ्यासू व्यक्तीमत्व असलेल्या हिम्मतराव बाविस्कर यांनी विंचू दंशावरील लस शोधत देशाचं नाव उज्वल केलं. रायगड (Raigad) जिल्ह्यातील महाडसारख्या ग्रामीण भागात हिम्मतराव बाविस्कर यांनी वैदकीय सेवा केली. विंचू दंशावरील लस शोधत त्यांनी जागतिक पातळीवर देशाचं नाव उंचावलं. विंचू चावल्यानंतर योग्य उपचार न मिळाल्यास जीव जात होता. याच विंचू दोषावर डॉ. बावस्कर यांनी काम करत लस शोधली. बावस्कर यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांचे जगभरातुन कौतुक केले गेले. ग्रामीण भागात केलेल्या या कामाची दखल घेत केंद्र सरकारकडून बावस्कर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.