नाशिक महापालिका आयुक्त कैलाश जाधव यांना पदावरुन हटवण्याचे आदेश; MHADA नियमांच्या उल्लंघनप्रकरणी चौकशीचे आदेश
Nashik : नियमानुसार साडे तीन ते चार हजार घरे MHADA ला हस्तांतरीत न केल्याने महापालिका आयुक्तांना पदावरुन हटवून त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
नाशिक: महानगरपालिका आयुक्त कैलाश जाधव यांना पदावरुन हटवण्याचे आदेश विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले आहेत. म्हाडाची घरे हस्तांतरीत न झाल्याप्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर आज विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर सभापतींनी महापालिका आयुक्तांना पदावरून हटवून त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
एक एकरहून अधिक क्षेत्रावरील बांधकामातील वीस टक्के बांधकाम आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हाडाला वर्ग करण्याचा नियम आहे. महापालिकेने त्याचे उल्लंघन केले. यासंदर्भात म्हाडाने लिहिलेल्या पत्रांना केराची टोपली दाखविली. त्यानंतर आता विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशीसह महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या बदलीचे आदेश दिले. या निर्णयाने महापालिकेत अक्षरशः भूकंप आल्याचे चित्र आज पहायला मिळाले.