Admission : अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या अर्जाचा भाग 2 भरण्यासाठी 22 जुलै पासून सुरुवात
अकरावी प्रवेशाच्या भाग 2 अर्जामध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजचे पसंती क्रमांक देता येणार आहेत. मात्र पुढील प्रवेश प्रक्रिया सीबीएसई निकालानंतरच सुरू होणार आहे.
मुंबई: दहावीचा निकाल जाहीर होऊन महिना झाल्यानंतरसुद्धा सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या निकालामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. त्यामध्ये आता अकरावी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या अर्जाचा भाग 2 भरण्याची प्रक्रिया येत्या 22 जुलैपासून सुरु करण्यात येत असल्याची माहिती शिक्षण संचलनालयाकडून देण्यात आली आहे. या अंतर्गत कॅप राउंड प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या दहा महाविद्यालयांचा पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविता येणार आहे.
दरम्यान 22 जुलैपासून विद्यार्थ्यांना केवळ पसंती नोंदविता येणार असून प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया आणि वेळापत्रक सीबीएसई निकालानंतरच जाहीर करण्यात येईल असे संचलनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य मंडळाचे बरेच विद्यार्थी अर्जाचा भाग 1 भरून भाग 2 साठी वाट पाहत असल्याने त्यांचा पुढील वेळ वाचण्यासाठी ही प्रक्रिया सुरु करण्यात येत असल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले. दरम्यान, प्रत्यक्ष प्रवेशाची फेऱ्या या सीबीएसई निकालानंतरच सुरु होणार आहेत.
शिक्षण संचालनालयाने राज्यातील ज्या क्षेत्रात अकरावीचे प्रवेश ऑफलाईन पद्धतीने होतात तेथे त्या ग्रामीण भागातील (भौतिक सुविधाथी पडताळणी करून प्रवेश क्षमता निश्चित करणेची कार्यवाही पूर्ण झालेल्या ) कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालकांना दिल्या आहेत. तसेच मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर), पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील ऑनलाईन पद्धतीने प्रवेश होत असतात त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांची अर्जाचा भाग 1 भरण्याची प्रक्रिया सुरु राहिलच सोबत अर्जाचा भाग 2 भरण्याची प्रक्रीया ही सुरु करता येणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी अर्ज भाग 2 भरण्याचे वेळापत्रक
-22 जुलै 2022 पासून - विद्यार्थ्यांना अर्जचा भाग 2 म्हणजे पसंतीची दहा महाविद्यालये प्राधान्यक्रमाने नोंदविता येणार.
-कोटांतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पसंती नोंदविता येणार आहे.
- विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग 2 भरल्यानंतर तो लॉक करणे आवश्यक असणार आहे.
- याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना अजूनही अकरावी प्रवेशासाठी नोंदणी अर्ज भरला नाही त्यांना ती करून भाग 1 आणि भाग 2 भरता येणार आहे
सीबीएसई निकालानंतर
- नियमित फेरी 1 साठी महाविद्यालय अलॉटमेंट आणि प्रवेशाची कार्यवाही याबाबत वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल.
- नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी, भाग 1 आणि भाग 2 भरणे यासाठी 4 ते 5 दिवस मिळणार आणि मग प्रवेश फेरी सुरु करण्यात येणार.
ज्या ठिकाणी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पार पडत नाही जिथे ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया पार पडते अशा ठाणे, रायगड, पालघर (एमएमआर रिजन बाहेरील) कॉलेजच्या ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक -(ग्रामीण भागातील प्रवेश)
19 ते 23 जुलै - अकरावी प्रवेश अर्ज याचे वितरण आणि संकलन.
25,26 जुलै - प्रवेश अर्जाची छाननी तपासणी गुणवत्तेनुसार निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करणे.
27 ते 30 जुलै- निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.