बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरून लाख रुपये लुटले, परभणीतील धक्कादायक प्रकार
बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याकडून एक लाख रुपयांची रक्कम लुटण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Parbhani News Upadate : पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला बंदूकीचा धाक दाखवून त्याच्याजवळील एक लाख रूयांची रक्कम लुटण्यात आली आहे. तीन अज्ञात चोरट्यांचा हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. परभणी जिल्ह्यामधील मानवत तालुक्यातील रूढी पाटी येथे ही घटना घडली आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत चोऱ्या, दरोडे आणि चैन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच काल रात्री पेट्रोल पंपावर घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील रूढी पाटी येथील पेट्रोल पंपावर काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तीन जण दुचाकीवरून आले. या तिघांनी आपल्या दुचाकीत पेट्रोल टाकले आणि त्यातील एकाने पेट्रोल टाकणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पोटाला बंदूक लावली. पोटाला बंदूक लावून कर्मचाऱ्याजवळील एक लाख रूपयांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.
पेट्रोल पंपावर काम करणारे भीमाशंकर दळवे यांनी याबाबात मानवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दळवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पेट्रोल पंपावर डिझेल टाकण्यासाठी एक आयशर टेम्पो आला. या टेम्पोत डिझेल भरत असतानाच टेम्पोच्या मागे एक चुचाकी आली. या दुचाकीवर तोंडाला रूमाल बांधलेल्या तीन व्यक्ती होत्या. दळवे यांनी या दुचाकीत दोनशे रुपयांचे पेट्रोल टाकले. दुचाकीत पेट्रोल भरल्यानंतर गाडीवरील दोघेजण खाली उतरले. त्यातील एकाने बंदूक काढून दळवे यांच्या पोटाला लावली आणि त्यांच्याजवळील एक लाख रुपयांची रक्कम काढून घेऊन पसार झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही तपासला असता यामध्ये चोरीची ही घटना कैद झाली आहे.
महत्वाच्या बातम्या