पंचनामे काय करता? शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे : आमदार नमिता मुंदडा
बीड (Beed) जिल्ह्यात नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना मदत देऊ, असे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलंय. तर पावसाचे सत्र थांबताच सरसकट मदतीची प्रक्रिया होणार, धनंजय मुंडे यांची माहिती.
![पंचनामे काय करता? शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे : आमदार नमिता मुंदडा One hundred percent compensation should be given says MLA Namita Mundada पंचनामे काय करता? शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे : आमदार नमिता मुंदडा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/28/6ae40beaf01d65c27737a7fb221d28f9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
परळी : बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात गोदावरी, मांजरा, सिंदफना आदी नद्यांच्या क्षेत्रात सातत्याने सुरू असलेल्या अतिवृष्टीने अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ आदी सर्व प्रशासकीय यंत्रणा हाय अलर्ट मोडवर असून पुरात अडकलेल्या लोकांना मदतकार्य करत आहेत. जिल्ह्यात मनुष्यहानी, पशुहानी यासह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अशा परिस्थितीत जलसंपदा व महसूल प्रशासनाकडून आवश्यक माहिती घेऊन मदत देण्यासंबंधीची कार्यवाही करण्यात येईल; अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, पंचनामे काय करता? शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी केलीय.
लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येतंय : धनंजय मुंडे
सातत्याने होत असलेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात खूप मोठे नुकसान झाले आहे. काल रात्री बीड जिल्ह्यातील विविध नद्यांना व विशेषतः अंबाजोगाई तालुक्यात मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला, रस्ते-पूल तुटले, वाहून गेले अशा अनेक बातम्या येत आहेत. अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला असून पुराच्या ठिकाणी रात्रीत लोक अडकले होते. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे. बऱ्याच प्रमाणात पशुहानी झाल्याचे वृत्त आहे; याबाबत जिल्हाधिकऱ्यांशी चर्चा करून आवश्यक निर्देश दिले आहेत. त्यांच्याकडून अधिकृत आकडेवारी मिळेलच, असे पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.
सततच्या पावसाने बाधित क्षेत्राची आकडेवारी बदलत आहे, त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर पंचनामे अंतिम करून नुकसान झालेल्या शेतीला सरसकट मदत देण्यासंबंधीची प्रक्रिया राबविली जाईल. पूर परिस्थितीत मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 24 तास कार्यरत वॉर रूम सुरू करण्याचेही निर्देश दिले आहेत; असेही पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.
दरम्यान रात्रीतून जिल्ह्यातील विविध तलावांचे दरवाजने उघडले, अनेक नद्यांना पूर येत आहेत. पुराचे पाणी रस्त्यावर असताना त्यातून वाहने घालण्याचे किंवा चालत जाण्याचे धाडस करणे टाळावे, पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या गावांनी नजीकच्या शासकीय यंत्रणांना याबाबत माहिती द्यावी. वाहत्या नद्या, जलाशय, धोकादायक बांधकामे अशा ठिकाणी पूर्णपणे टाळावे असे आवाहनही पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी केले आहे.
पंचनामे काय करता? शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे : आमदार नमिता मुंदडा
केज विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये शंभर टक्के नुकसान झालेले आहे. रस्ते बंद आहेत, शेतीमध्ये गुडघाभर पाणी आहे हे नुकसान टक्केवारीमध्ये मोजता येणार नाही. त्यामुळे पंचनामे न करता अगदी सरसकट शेतकऱ्यांना 100 टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)