Baramati : दुर्दैवी! लग्न मंडपातूनच नवरदेवाची आधी वरात निघाली अन् नंतर तिरडी; लग्नाच्या पाचव्या दिवशी ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
लग्नाच्या पाचव्या दिवशी नवरदेवाचा हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये ही घटना घडली.
Baramati News : लग्नाच्या पाचव्या दिवशी नवरदेवाचा हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये ही घटना घडली. सचिन येळे असं मृत्यू झालेल्या नवरदेवाचं नाव आहे. सचिन आणि हर्षदा यांचा विवाह 19 तारखेला बारामती तालुक्यातील (Baramati News Updates) शारदा नगर येथे झाला होता. लग्न झाल्यानंतर पाचव्या दिवशी नवरदेवाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने हर्षदा पाचव्या दिवशी विधवा झाली आहे. मुलाच्या अचानक मृत्यूने येळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर पसरला आहे.
19 तारखेला दोघांचा विवाह झाला होता. सचिन घरातील सगळ्यात लहान असल्याने त्याचा विवाह कुटुंबियांनी धुमधडाक्यात केला होता. लग्नात कसलीही कसर सोडली नव्हती. शारदानगर येथे लग्न समारंभ पार पडला. त्यानंतर रविवारी आणि सोमवारी रीतीरिवाज तसेच विधीवत देवदर्शनासाठी नवदंपत्य नातेवाईकांसह सोमवारी घरी परतले होते. त्यानंतर पूजा झाली आणि त्याच पहाटे सचिनला ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर नातेवाईकांनी त्वरीत त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
लग्न मंडपातून उठली नवरदेवाची तिरडी
दोघांचा विवाह होऊन पाच दिवस झाले होते. घरातील पाहुणे मंडळी परतायचे होते. मंडपही जशासतसा उभा होता. मात्र नियतीने क्रूरतेचा कळस गाठला. संसार सुरु होण्याआधीच नवरी मुलगी विधवा झाली आणि लग्नाच्या मंडपातून नवरदेवाची पाचव्याच दिवशी तिरडी उठली. या घटनेमुळे गावात शांतता पसरली आहे. सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. संसाराची स्वप्न पाहणाऱ्या नवरीला मात्र पतीची तिरडी बघावी लागली आहे.
तरुणांमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याच्या प्रमाणात वाढ
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडीतही अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू झाला होता. वैभव राऊत असं 25 वर्षीय तरुणाचं नाव होतं. तरुणांमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याच्या प्रमाणात वाढ का होत आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. सध्याच्या बदलत्या युगात खानपान तसंच बदललेली लाईफस्टाईल यामुळं तरुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढत चाललं आहे. कमी वयात मुलं मादक पदार्थांच्या आहारी जाताना दिसत आहेत. कमी वयातील व्यसनं, तणाव ही देखील हृदयविकारचा झटका येण्यामागील मुख्य कारणं आहेत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात विशिष्ट प्रकारचे बदल होऊ शकतात. ज्यामुळे तरुणांना अचानक हृदयविकाराचं प्रमाण वाढलं असल्याचं तज्ञांचं मत आहे.