20 जानेवारीला मनोज जरांगेची मुंबईकडे कूच, ओबीसी नेत्यांनीही आंदोलनाची मागितली परवानगी, सरकार काय भूमिका घेणार?
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे अंतरवली सराटी येथून 20 जानेवारी रोजी मुंबईकडे कूच करणार आहेत. याचवेळी म्हणजे, 20 जानेवारी रोजी ओबीसी मोर्चासाठी ओबीसी जनमोर्चाने मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली आहे.
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे अंतरवली सराटी येथून 20 जानेवारी रोजी मुंबईकडे कूच करणार आहेत. याचवेळी म्हणजे, 20 जानेवारी रोजी ओबीसी मोर्चासाठी ओबीसी जनमोर्चाने मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. विविध मागण्यांसाठी 20 जानेवारीला ओबीसी समाजाचं राज्यभर आंदोलन होणार आहे. 20 जानेवारी रोजी आझाद मैदानावरील आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. 20 जानेवारीपासून ओबीसीचं आंदोलन होणार आहे. आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याची भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे.
ओबीसी आणि मराठा आंदोलन आमनेसामने येणार? सरकारची भूमिका काय असणार?
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी 20 जानेवारीपासून मनोज जरांगे आणि मराठा बांधव मुंबईकडे कूच करणार आहेत. 26 जानेवारी रोजी ते मुंबईत दाखल होणार आहेत. त्याचवेळी म्हणजे, 20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलनासाठी ओबीसी समाजाने परवानगी मागितली आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन करु, अशी भूमिका ओबीसी नेते आणि माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांनी घेतली आहे. एकाचवेळी मुंबईत ओबीसी आणि मराठा समाज आंदोलनासाठी आमने सामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलिस आणि राज्य सराकर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आम्ही ही शांत बसणार नाही - प्रकाश अण्णा शेंडगे
ओबीसी समाजातून आरक्षण मिळावं म्हणून राज्यात मराठा समाजाने प्रचंड मोठं आंदोलन उभं केलं आहे. यामुळे सरकार दबाव निर्माण झालाय. मात्र सरकारने आम्हाला आश्वासन दिलंय आमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. मात्र मराठा नेते आणि आयोग धडाधड नोंदी कुठून तरी शोधतय.
त्यात पुन्हा 20 जानेवारीच अल्टीमेंटम सरकारला मराठा समाजाने दिलंय, त्यामुळे सरकार दडपणात धडाधड रात्री शासन निर्णय काढतंय. मात्र यात सरकारने लक्षात घ्यावं आम्ही ही शांत बसणार नाही. आम्ही देखील असं असेल तर 20 तारखेला महाराष्ट्रात असं आंदोलन करणार आहे. आमचं एकच म्हणणं आहे आमच्या आरक्षणाला धक्का लावून घेऊ नका. आमचा त्यांचा आरक्षणाला विरोध नाही, असे प्रकाश अण्णा शेंडगे म्हणाले.
आम्हालाही आंदोलनाला परवानगी द्या -
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र आमच्यातूनच आरक्षण मराठा नेते मागत आहेत. त्यांना सरकारने मोर्चाला आंदोलनाला परवानगी दिली तर आम्हाला ही द्या. आम्ही दहा लाख गाड्या आणू शकत नाही, इतकी श्रीमंती आमच्याकडे नाही. आमचे लोकं बैलगाडी, गाढवावर येतील. ओबीसी मधले 5 ते 50 लाख लोकं मुंबईत येऊ शकतात, जे काय कुणबी दाखले दिलेत ते रद्द करावेत. आमच्यातून आरक्षण देऊ देणार नाही, शिंदे समितीने जे काही अभ्यास अहवाल दिलाय तो बोगस आहे. या समितीची चौकशी करा, मराठा समाज मागास नाही. शिंदे समिती आणि यांचा डाव आम्ही मोडणार आहे, असे शेंडगे म्हणाले.
तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार -
मागासवर्गीय आयोग हायजॅक केलं, संपूर्ण आयोग मराठा करून टाकलं आहे. हा सगळा प्रकार भयानक आहेशुक्रे यांची नेमणूक चुकीची आहे, पाटील यांच्या हाथ पाय हे काही दिवसापूर्वी जोडत होते. आयोगाचा अहवाल फ़िक्सिन्ग करायच सुरु आहे. आमची जातनिहाय जनगणना करावी. सरकार जो पर्यंत आमच्याबद्दल निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही आता आंदोलन सुरु ठेवणार आहे, असे शेंडगे म्हणाले.
फक्त विशेष अधिवेशन मराठ्यांसाठी का ?
आमच्याकडून सरकारला आता सुट्टी नाही. आम्हाला ही तसाच निधी द्या. जसा त्यांना दिलात. महाराष्ट्रातील सगळ्या संघटना हे या 20 जानेवारीच्या आंदोलनात असतील. मोठ्या संख्येने ओबीसी रस्त्यावर येणार आहेत. ओबीसीच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात. फक्त विशेष अधिवेशन मराठ्यांसाठी का सर्व समाजासाठी घ्या, असे शेंडगे म्हणाले.
भाटिया कमिशनचा काही लोकं रिपोर्ट मांडत अश्या प्रकारे आरक्षण द्या पण तेही योग्य नाही. जर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं तर 2024 ला ओबीसी समाज तुम्हाला जागा दाखवेल. जर आमच्या आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही राज्यात सगळे एकत्र येऊन पर्याय देऊ, असे शेंडगे म्हणाले.
मनोज जरांगेंचं शिष्टमंडळ आज मुंबईत -
मराठा समाजाच्या आंदोलनासाठी मुंबईत आज मैदानाची पाहणी आणि नियोजन केले जाणार आहे. 20 जानेवारीपासून मनोज जरांगे यांचे नेतृत्वात मराठा समाजाच मुंबईत आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत मनोज जरांगे यांचे एक शिष्टमंडळ मुंबईत मैदानाची पाहणी करण्यासाठी आणि यासंदर्भात नियोजन करण्यासाठी आलेत. मुंबईतील मराठा समाजाच्या समन्वयकांशी हे शिष्टमंडळ आज अकरा वाजता चर्चा करेल आणि नंतर आज तीन मैदानांची पाहणी करेल. यामध्ये मुंबईतील आजाद मैदान , छत्रपती शिवाजी पार्क मैदान आणि बीकेसी वांद्रे येथील मैदान असेल.