आता कोविड केअर सेंटरमध्येही पैसे मोजावे लागणार, पंढरपुरात पेड कोविड सेंटरचा प्रयोग
पंढरपूरमध्ये आता कोविड केअर सेंटरमध्येही पैसे मोजावे लागणार आहेत. पेड कोविड सेंटरचा पहिला प्रयोग पंढरपूरमध्ये होत आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजनची सोय करुन मगच रुग्णांना प्रवेश द्या, असा आदेश खासगी रुग्णालयांना देण्यात आला आहे. परंतु या दोन्ही गोष्टींमुळ गोरगरीब कोरोना रुग्णांच्या अडचणीत मात्र मोठी वाढ झाली आहे.
पंढरपूर : निवडणुकीनंतर कोरोनाचा मोठा फैलाव पंढरपूर भागात झाल्याने सारे हॉस्पिटल आणि कोविड केअर सेंटर फुल झाल्याने आता कोरोनाग्रस्त नागरिकांना रोज 700 रुपये मोजून केअर सेंटरमध्ये जावे लागणार आहे. पेड कोविड केअर सेंटरचा पहिला प्रयोग पंढरपूरमध्ये होत असून मंदिर समितीच्या वेदांत आणि व्हिडिओकॉन या दोन भक्त निवासमध्ये या पेड सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
डिव्हीपी ग्रुप आणि कल्याणराव काळे यांच्या जनकल्याण हॉस्पिटलकडून हे दोन पेड सेंटर चालवण्यात येणार आहेत. यासाठी मंदिर समितीने मोफत 200 बेडसह ही भक्त निवास या दोन खाजगी संस्थांना दिले आहेत. कोरोना रुग्णांना इथे वैद्यकीय उपचारांसोबत चहा, नाश्ता, भोजन या संस्थेमार्फत दिले जाणार आहे. याशिवाय रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून नियमित तपासणी, योगा, संगीत अशा सुविधा पुरवल्या जाणार आहेत. कोरोना उपचाराला आता पैसे मोजावे लागणार असल्याने मोकाट फिरणाऱ्या आता आळा बसू शकणार असला तरी गोरगरीब रुग्णांना मात्र हा खर्च परवडणारा नाही.
आता खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण घ्यायचे असतील तर त्या हॉस्पिटलला ऑक्सिजनची सोय करावी लागणार असल्याने आता पुन्हा रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये बेड शोधायची वेळ येणार आहे. सध्या सोलापूर जिल्ह्याला 58 टन ऑक्सिजन लागत असून तो कसातरी पुरवावा लागतो. त्यामुळे खासगी रुग्णालयांना आता त्यांच्या ऑक्सिजनची सोय बघूनच रुग्णांना दाखल करुन घेण्याचे आदेश दिल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. पेड कोविड सेंटर असो किंवा हॉस्पिटलबाबत दिलेले नवीन आदेश असोत हे सर्व गोरगरीब रुग्णांच्या अडचणी वाढवणारे ठरणार आहेत.