(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : शरद पवार विरोधकांचा चेहरा झाल्यास आनंद वाटेल; नितीश कुमार
Nitish Kumar Visit Sharad Pawar: देशातील लोकशाही वाचवायची असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मत मांडलं आहे.
Nitish Kumar Visit Sharad Pawar: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जर 2024 सालच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचा चेहरा झाल्यास आपल्याला आनंदच वाटेल असं जनता दल युनायटेडचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटलंय. भाजप देशविरोधी काम करत असून त्याच्याविरोधात देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलचे अध्यक्ष तेजस्वी यादव यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
नितीश कुमार म्हणाले की, देशात भाजप जे काही करतंय ते चुकीचं करतंय. भाजप देशविरोधी काम करत आहे, त्यामुळे देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्रित आल्यास लोकशाही वाचेल. त्याचाच एक भाग म्हणून आपण आज शरद पवारांची भेट घेतली. इतरही विरोधी पक्षांच्या आम्ही भेटी घेऊ.
शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर वाईट वाटल्याचं नितीश कुमार म्हणाले. आमचं हेचं म्हणणं होतं की विरोधी पक्षांना तुमची गरज आहे, त्यामुळं राजीनामा मागे घ्या अशी आमची मागणी होती असं नितीश कुमार म्हणाले.
लोकशाही वाचवायची असेल तर विरोधकांनी एकत्र यावं: शरद पवार
देशातील लोकशाही वाचवायची असेल तर सर्व विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ते म्हणाले की,
कर्नाटकात भाजपविरोधी सरकार सत्तेत येणार आहे, हीच परिस्थिती आज देशभर आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन काम करावं लागणार आहे. विरोधकांनी एकत्र राहिल्यास विजय निश्चित आहे.
विरोधी पक्षाचा चेहरा कोण असावा याचा निर्णय नंतर घेतला जाईल, त्यामुळे सध्या सर्वांनी एकत्र येणं ही पहिली गरज आहे असं शरद पवार म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालावर बोलताना शरद पवार म्हणाले की, कोर्टाने राज्यकर्त्यांबाबत तीव्र भूमिका मांडली आहे. काही निर्णय अद्याप येणं बाकी आहे. अपात्रतेचा निर्णय घ्यावा याबाबत कोर्टाने अध्यक्षांना सांगितलं आहे.
राज्यपालांची भूमिका चुकीची राहिली होती याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिलं आहे असं शरद पवार म्हणाले. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे पण तत्कालीन राज्यापालांकडून राज्यघटनेतील तरतुदींची वेळोवेळी पायमल्ली केली गेली असंही शरद पवार म्हणाले.
ही बातमी वाचा :