Narayan Rane : काल नारायण राणे म्हणाले, मी मूर्ख वाटलो का, आज पोलिसांनी नोटीसच धाडली, मात्र नोटीसमध्ये नेमकं काय?
नोटीस मिळताच नितेश राणेंना हजर करा अशी नोटीस कणकवली पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना जारी केली आहे.
![Narayan Rane : काल नारायण राणे म्हणाले, मी मूर्ख वाटलो का, आज पोलिसांनी नोटीसच धाडली, मात्र नोटीसमध्ये नेमकं काय? Nitesh Rane police issued a notice to Narayan Rane but what exactly is in the notice Narayan Rane : काल नारायण राणे म्हणाले, मी मूर्ख वाटलो का, आज पोलिसांनी नोटीसच धाडली, मात्र नोटीसमध्ये नेमकं काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/20/6b4936ebac434fefd77d1ade94fd3848_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्ग पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. कणकवली पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून आमदार नितेश राणे यांच्याबाबतची माहिती देण्याबाबत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. नितेश राणे यांच्यावर शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. मात्र ते पोलिसात हजर झालेले नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरु आहे. त्याबाबत नारायण राणे यांना पत्रकारांनी विचारलं असता, नितेश कुठे आहे हे सांगायला मी मूर्ख आहे का असं म्हटलं होतं. त्यावरुनच आता कणकवली पोलिसांनी नोटीस पाठवून नारायण राणे यांनी नितेश राणे यांची माहिती द्यावी असं म्हटलं आहे.
नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?
सत्ताधारी आणि प्रशासन आमच्या विरोधात काम करत आहे. हल्ला प्रकरणात विनाकरण आमदार नितेश राणे यांना गोवण्यात आलं आहे. केवळ खरचटलं त्यासाठी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि इतर अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात याचा अर्थ पोलीस दबावाखाली काम करत आहेत. आमदार राणे यांचा कोणताही संबंध नसताना गुन्हे दाखल केले गेले आहे. आम्ही त्या विरोधात लोकशाही पद्धतीनं कायदेशीर लढाई लढणार आहोत, अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली.
याचवेळी नितेश राणे कुठे आहेत असा प्रश्न नारायण राणे यांना विचारण्यात आला. त्यावर नारायण राणे म्हणाले, असा प्रश्न असतो का? नितेश राणे कुठे आहे? हे सांगायला काय मूर्ख माणूस समजलंत का? नितेश राणे कुठे आहेत, काय आहेत जरी मला माहिती असलं तरी मी सांगणार नाही, का सांगावं? तुम्हाला का सांगावं? ज्यांनी खोट्या केसमध्ये गोवलं त्यांना विचारा.
पोलिसांच्या नोटीसमध्ये नेमकं काय?
कणकवली पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये नारायण राणे यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी हजर राहावं असं म्हटलं आहे. इतकंच नाही तर नितेश राणे हे पाहिजे आरोपी असून, त्यांचा शोध लागत नाही. या आरोपीचा शोध जारी आहे.
आपण काल पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी या खटल्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं. पाहिजे आरोपी नितेश राणे कुठे आहेत असा प्रश्न विचारला होता, त्यावर तुम्ही 'नितेश राणे कुठे आहे हे सांगायला मी मूर्ख वाटलो का' असं म्हटलं.
या विधानावरुन नितेश राणे कुठे आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला आहे. त्यामुळे ही नोटीस मिळताच तुम्ही आरोपी नितेश राणे यांना पोलिसांसमोर हजर करा. तसंच या गुन्ह्याबाबत जबाब नोंदवण्यासाठी कणकवली पोलिसात 29 डिसेंबरला दुपारी 3 वाजता हजर राहावं असं पोलिसांनी म्हटलं आहे.
वैभव नाईक काय म्हणाले?
पोलिसांची नोटीस योग्यच आहे. नितेश राणे कुठे आहे हे सांगणार नाही असं नारायण राणे म्हणाले. तसंच संतोष परबला एवढीशी मारहाण झाली असं म्हणत राणेंनी मारहाणीचं समर्थन केलं. केंद्रीय मंत्र्याने असं समर्थन करणे योग्य नाही. नितेश राणे कुठे आहेत हे नारायण राणे यांना माहिती आहे. केंद्रीय मंत्री म्हणून नारायण राणे माहिती लपवू शकतात, पण पोलिसांनी नोटीस पाठवून योग्य निर्णय घेतला आहे, असं शिवसेना आमदार वैभव नाईक म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)