New Year 2022 : नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं; निर्बंध असतानाही राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी
New Year 2022 Celebration in Maharashtra Temple : कोरोना संकट वाढल्यानं मंदिरात गर्दी टाळणं गरजेचं आहे. मात्र तरीही राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
New Year 2022 Celebration in Maharashtra Temple : नवी स्वप्न आणि आशाआकांक्षांसह नववर्षाचा सूर्योदय झाला आहे. जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जातंय. एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झालीय. संकट वाढल्यानं मंदिरात गर्दी टाळणं गरजेचं आहे. मात्र तरीही राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांनी शिर्डीत मोठी गर्दी
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांनी शिर्डीत मोठी गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री 9 वाजता मंदिर बंद करण्यात आलं होतं. आज सकाळी 6 वाजेपासून साईदर्शन पुन्हा झालंय. कडाक्याच्या थंडीतही भाविक साई दर्शनासाठी आतूर आहेत. नववर्षानिमित्ताने साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट कऱण्यात आली आहे. जमावबंदीचे आदेश धुडकावत भाविकांचा जल्लोष यावेळी पाहायला मिळाला. साई मंदिर परिसरात प्रवेश बंदी असताना रस्त्यावर भाविकांची गर्दी आहे. साई मंदिर बंद असल्याने भाविकांचा हिरमोड होताना दिसून येतोय.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर सजलं
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर सजलंय. विठोबाच्या मंदिरात फळे आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ढरपूरमधील विठ्ठल मंदिरात फळे आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सध्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असताना या भाविकांचे स्वागत पुण्यातील प्रदीप ठाकूर पाटील या भक्ताने अनोख्या पद्धतीने केले आहे. या सजावटीसाठी 1500 किलो देशी विदेशी फुले आणि 700 किलो फळांचा वापर करण्यात आला आहे.
नवं वर्षांची सुरुवात संत गजानन महाराजांच्या आरतीने
सरत्या वर्षाला निरोप देऊन नवं वर्षांची सुरुवात संत गजानन महाराजांच्या आरतीने करण्यासाठी शेगावातील मंदिरात आज सकाळी पहिल्या आरतीला भाविकांनी हजेरी लावली. आज नवीन वर्षाची सुरुवात हजारो भाविक संत गजाननाच्या दर्शनाने करत असून देशभरातून हजारो भक्त शेगावात दाखल झाले आहेत.
अंबाबाईच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी
आजच्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेऊन वर्षाची सुरुवात करण्याचा मानस अनेक भाविकांचा असतो. त्यामुळे आज देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली. कोल्हापूरसह पुणे, मुंबई या ठिकाणाहून खूप मोठ्या संख्येने भाविक अंबाबाईच्या दर्शनाला येत आहेत. लवकरात लवकर कोरोनाचं संकट दूर होऊन आणि पूर्वीप्रमाणे सर्वजण आनंदात आणि सुखासमाधानात राहूदे अशा पद्धतीचे साकडे भाविकांनी देवीला घातले.
सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी
नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. मात्र सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाच्या वतीने प्रत्येक तासाला 1500 लोकांना सोडण्यात येणार आहे. आज जवळपास दिवसभरात 15 हजार लोकं दर्शन घेण्याची शक्यता आहे.
रेणुका माता माहूर मंदिरात भक्तांची मांदीयाळी
श्री क्षेत्र रेणुका माता मंदिर माहूरगड येथे भक्तांची मांदियाळी जमली आहे.महाराष्ट्रासह,आंध्रप्रदेश,तेलंगणा,कर्नाटक,राज्यातून भाविकांनी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या माता रेणुकादेवीच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावलीय. सरत्या वर्षाला निरोप देत व भगवंताच्या चरणी आशीर्वाद घेत नवंवर्ष स्वागतासाठी येथे भक्तांची मांदियाळी पाहण्यास मिळाली. ओमायक्रॉन विषाणू संसर्गाच्या काळातही नियमांचे काटेकोर पालन करून भक्तांनी मनोभावे दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live