शिर्डीत साईबाबादर्शनासाठी नवीन नियमावली, सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच दर्शन
साईबाबांची शिर्डी हे आंतरष्ट्रीय तिर्थक्षेत्र असल्यानं येथे बाबांच्या समाधीच दर्शन घेण्यासाठी जगभरातून भाविक येतात. यामुळे येथे कोविडच्या पार्श्वभूमीवर अधिक काळजी घेण गरजेचे आहे.
शिर्डी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच भाविकांना साईंचं दर्शन घेता येणार आहे. पहाटेची काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीला भक्तांना उपस्थित राहाता येणार नाही. गुरुवार आणि सलग सुट्टीच्या दिवशी भक्तांना ऑनलाईन पास बंधनकारक आहे. तर गुरुवारी होणारा साईपालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे.
नियमावली : 1. दर्शनाची वेळ सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहे. 2. सकाळची काकड आरती आणि रात्रीची शेज आरती भक्तगणांसाठी खुली असणार आहे. 3. मुख दर्शन सुविधा फक्त या कालावधीत कोविड मार्गदर्शक तत्वे अनुसुरून चालू ठेवण्यात येणार आहे. 4. गुरुवारची पालखी व्यवस्था देखील या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आली आहे. 5. बायोमेट्रिक पास काऊंटरवर होत असलेल्या गर्दी पाहता गुरूवार, शनिवार, रविवार तसेच उत्सवाचे दिवस बायोमेट्रिक पास काऊंटर बंद करण्यात आले आहे. ऑनलाईन दर्शन पास व्यवस्था चालू असणार आहे. 6. भक्तांची दर्शन रांगेत ढोबळ चीचणी करण्यात येणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी 150 तर गुरूवार, शनिवार आणि रविवारी 200 जणांची चाचणी घेण्यात येणार आहे.कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी शिर्डी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी ग्रामस्थ आणि भाविकांना समज देण्यासाठी मास्क वाटप करत जनजागृती केली. विना मास्क आढळल्यास एक हजार रुपये तर सार्वजनिक जागी थुंकल्यास पाच हजार रुपये दंड आकारणी करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिली आहे.
साईबाबांची शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असल्यानं येथे बाबांच्या समाधीच दर्शन घेण्यासाठी जगभरातून भाविक येतात. यामुळे येथे कोविडच्या पार्श्वभूमीवर अधिक काळजी घेण गरजेचे आहे. सध्या राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शिर्डीत नगरपंचायचे पदाधिकारी आणि अधिकारी यांची नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक पार पडली.
शहरात विनामास्क दिसणा-या प्रत्येक व्यक्तीला एक हजार रुपये दंड तसेच रस्त्यावर थुंकणा-या व्यक्तीला पाच हजार रुपये दंड आकारणी केली जाणार असल्याचं नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी म्हटले आहे. मोठ्या रकमेचा दंड आकारुन पैसे जमा करणं हा नगरपंचायतचा उद्देश नसून शिर्डी शहराला पुन्हा लॉकडाऊन पासून वाचवणं तसेच येथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी या उपाययोजना केल्या जात आहे. आज ही शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक विना मास्क फिरताना दिसून येत आहे. व्यावसायिक, दुकानदार कोविड नियम पाळत नाही, मास्क वापरणे बंधनकारक असून देखील मास्क वापरत नाही अशा सर्वांना नगरपंचायतच्या पदाधिक-यांनी चांगलाच दम देखील दिला आहे. मास्क वापरा नाही तर उद्यापासून एक हजार रुपये भरा अशी मोहिम नगर पंचायतीने हाती घेतली असून नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.