LIVE UPDATES | बिलोली बलात्कार व हत्या प्रकरणातील दोन आरोपींना नांदेड पोलिसांकडून अटक
बर्ड फ्लूबाबत अफवा अन् चुकीची माहिती पसरु नये यासाठी प्रशासनाने योग्य माहिती द्यावी : मुख्यमंत्री लसीकरणाबाबत अफवा पसरु नये, राज्य सरकारांनी काळजी घ्यावी, पंतप्रधान मोदींच्या सूचना हिंगणघाटच्या प्राध्यापिका जळीत कांडप्रकरणी तीन जणांची साक्ष नोंद हनुमा विहारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून बाहेर दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
बर्ड फ्लूबाबत अफवा अन् चुकीची माहिती पसरु नये यासाठी प्रशासनाने योग्य माहिती द्यावी : मुख्यमंत्री
बर्ड फ्लूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरु नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी. माणसांमध्ये या रोगाचे संक्रमण होत नसल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बर्ड फ्लू संदर्भांत राज्यातील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घेतला. ठाकरे यांनी बर्ड फ्लू संदर्भात आढावा घेवून नंतर लगेचच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हीसीद्वारे बर्ड फ्लू संक्रमण आणि घ्यावयाची काळजी या संदर्भात निर्देश दिले. या संदर्भातील निर्देशांची गांभीर्याने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. या रोगाचे तात्काळ निदान होण्याकरीता राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागासाठी जैवसुरक्षास्तर 3ही अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. ज्या भागात बर्डफ्लू रोगाची लागण नाही अशा भागात अंडी व मांस 70 डीग्री पेक्षा जास्त तापमानात शिजवून खाल्ल्यास काहीही धोका नसल्याचे नमूद करून याबाबत गैरसमज व अफवा पसरविण्यात येवू नयेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
लसीकरणाबाबत अफवा पसरु नये, राज्य सरकारांनी काळजी घ्यावी, पंतप्रधान मोदींच्या सूचना
देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला. यामध्ये त्यांनी कोरोनाच्या लसीकरण कार्यक्रमाच्या नियोजनावर चर्चा केली. तसेच लसीकरणाबाबत अफवा पसरु नये याची राज्य सरकारांनी काळजी घ्यावी, असं देखील सांगितलं आहे. देशात भारत बायोटेकची Covaxin आणि ऑक्सफोर्ड अॅस्ट्राजेनेकाची Covishield या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. या संवादात मोदी म्हणाले की, या लसीकरण अभियानात लस देणाऱ्यांची ओळख आणि मॉनिटरिंग सर्वात महत्वाची आहे. त्यासाठी आधुनिक टेक्नॉलॉजीचा उपयोग करत को-विन नावाचा एक डिजिटल प्लॅटफॉर्म देखील बनवला आहे.
हिंगणघाटच्या प्राध्यापिका जळीत कांडप्रकरणी तीन जणांची साक्ष नोंद
राज्यभर गाजलेल्या हिंगणघाट येथील प्राध्यापिकेच्या जळीतकांड प्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरूवात झाली आहे. हिंगणघाटच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन. माजगावकर यांच्या न्यायालयात तीन जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. हिंगणघाट येथे विक्की उर्फ विकेश नगराळे याने प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं. उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी विकेश नगराळेवर गुन्हा दाखल करून अटक केली होती. या प्रकरणाची सुनावणी हिंगणघाट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात होत आहे. शासनाच्या वतीने फिर्यादी पक्षाकडून विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी युक्तीवाद केला आहे.
हनुमा विहारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून बाहेर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंच्या फिटनेसची समस्या वाढत चालली आहे. सिडनीतील ड्रॉ केलेल्या तिसर्या कसोटी सामन्याचा हिरो हनुमा विहारी हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे ब्रिस्बेनमधील चौथा कसोटी सामना खेळू शकणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सामन्यानंतर विहारीला स्कॅन करण्यासाठी नेण्यात आले. मंगळवारी संध्याकाळपर्यंत त्याचा अहवाल अपेक्षित आहे. येत्या 15 जानेवारीपासून सुरू होणार्या पुढील सामन्यापर्यंत विहारी फिट होऊ शकणार नाही, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे. हनुमा विहारीने आर अश्विनच्या साथीने 161 चेंडूत 23 धावा करून सिडनी कसोटी ड्रॉ करण्याची महत्वाची भूमिका निभावली. विहारीच्या जागी पर्याय म्हणून रिद्धिमान साहाला स्थान दिलं जाऊ शकतं.