इंग्लंडवरुन आलेला नागपूरचा तरुण कोरोनाबाधित, प्रशासन सतर्क
इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला नागपूरमधील 28 वर्षीय तरुण कोरोनाबाधित आढळला आहे. इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला हा तरुण कोरोनाच्या नवीन प्रकाराने बाधित असल्याचा संशय आहे. या कोरोना संशयितामुळे प्रशासनही सतर्क झाले आहे.
नागपूर : इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला नागपूरमधील 28 वर्षीय तरुण कोरोनाबाधित आढळला आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराची अनेकांना लागण झाली आहे. त्यामुळे इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला हा तरुण कोरोनाच्या नवीन प्रकाराने बाधित असल्याचा संशय आहे. या कोरोना संशयितामुळे प्रशासनही सतर्क झाले आहे. बाधित तरुणावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवले आहेत. हा तरुण इंग्लंडमधून आल्यानंतर नागपूरसह गोंदियात अनेकांच्या संपर्कात आला होता. या तरुणाच्या संपर्कात आलेले कुटुंबातील सदस्यांसह इतर काही जणही कोरोनाबाधित झाले आहेत.
शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अविनाश गावंडे यांनी सांगितलं की, 28 वर्षीय तो तरुण एक महिना नोकरी निमित्त इंग्लडला होता. 29 नोव्हेंबरला तो नागपुरात आला. त्यावेळी त्याची विमानतळावर त्याची कोरोना टेस्ट झाली होती. त्यावेळी त्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र नंतर त्याला लक्षण वाटले म्हणून त्याने 15 डिसेंबरला नंदनवन केंद्रावर पुन्हा कोरोना चाचणी केली. त्यावेळी त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. सध्या तो मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याचे नमुने पुण्याला एनआयव्हीला पाठवले आहे. तिथून रिपोर्ट आल्यावर चित्र स्पष्ट होईल, असं गावंडे यांनी सांगितलं.या तरुणाच्या संपर्कात आलेले कुटुंबातील 4 जण आणि त्याने गोंदियाला भेट दिली होती तिथले 3 ते 4 जण कोरोनाबाधित झाले आहेत, अशी माहिती मिळाली आहे. सध्या या रुग्णाला केवळ loss of smell एवढंच लक्षण असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.