नेपाळच्या तरुणीवर यूपीत आठवडाभर बलात्कार, पळ काढून महाराष्ट्रात पोहोचलेल्या तरुणीची नागपुरात तक्रार
पीडित तरुणीने त्या तरुणाच्या तावडीतून आपली सुटका करून घेत कसे तरी नागपूर गाठले आणि घडलेल्या प्रकाराची तक्रार महाराष्ट्रातील कोराडी पोलीस स्टेशनमध्ये दिली.
नागपूर : उत्तर प्रदेशातील हाथरस, बलरामपूर मधील बलात्काराचे प्रकरण गाजत असताना आता उत्तर प्रदेशातून बलात्काराचे एक प्रकरण महाराष्ट्रात पोहोचले आहे. नेपाळच्या एका 22 वर्षीय मुलीला प्रवीण नावाच्या एका तरुणाने लखनौमध्ये डांबून ठेवत एक आठवडा बलात्कार केल्याचा आरोप त्या तरुणीने केला आहे.. धक्कादायक बाब म्हणजे पीडित तरुणीने त्या तरुणाच्या तावडीतून आपली सुटका करून घेत कसे तरी नागपूर गाठले आणि घडलेल्या प्रकाराची तक्रार महाराष्ट्रातील कोराडी पोलीस स्टेशन मध्ये दिली.
नागपूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आणि उत्तर प्रदेश पोलिसांशी प्राथमिक माहिती घेत ( झिरो कलम अन्वये ) गुन्हा नोंदविला असून पुढील कारवाईसाठी पीडित तरुणीला महाराष्ट्रातील महिला पोलिसांसह उत्तर प्रदेशात रवाना केले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, नेपाळची 22 वर्षीय तरुणी दोन वर्षांपूर्वी नोकरी निमित्ताने भारतात आली होती. आधी नोएडा त्यानंतर लखनऊला तिने नोकऱ्या केल्या. लखनौ मधील तिच्या मैत्रिणीच्या एका मानलेल्या भावासोबत ( प्रवीण ) तिची ओळख झाली. काही दिवसांपूर्वी पैशाच्या देवाण घेवाणी वरून मैत्रिणीसोबत वाद झाल्यानंतर प्रवीणने पीडितेला एका मित्राच्या घरी डांबून ठेवले. त्याकाळात प्रवीणने तिच्यावर अत्याचार करत तिचे पासपोर्ट आणि इतर साहित्य हिसकावून घेतले आणि तिला मारहाण केली. पीडित तरुणीने एक आठवडा अत्याचार सहन केले.. त्यानंतर कसे तरी आपल्या नागपुरातील एका नेपाळी मैत्रिणीसोबत फोनवर संपर्क करत मदत मागितली. त्या मैत्रिणीने तिला लखनऊ ते नागपूर प्रवासासाठी ओला बुक करून दिली. ठरलेल्या वेळी पीडितेने डांबून ठेवलेल्या घरातून आपली सुटका करून घेत पळ काढला आणि ओला ने नागपूर गाठले. नागपुरात आल्यावर तिने कोराडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
प्रकरण उत्तर प्रदेशातील लखनऊमधील असल्याने कोराडी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधले. उत्तर प्रदेशातून घटने बद्दल आणि पीडिता सांगत असलेल्या जागांच्या तापशीलाबद्दल प्राथमिक माहिती घेतली. खात्री पटल्यानंतर नागपूरात कोराडी पोलीस स्टेशन मध्ये (झिरो कलमान्वये) पीडितेला डांबून ठेवणे, मारहाण करणे, बलात्कार करणे असे गुन्हे नोंदवण्यात आले आहे. पुढील तपास आणि कारवाई साठी प्रकरण उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून काल रात्री पीडितेला महाराष्ट्र पोलिसांच्या महिला पथकासह लखनौला रवाना केले आहे.