NCP News : राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या तटकरेंच्या हाती, सुनिल तटकरे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय खजिनदार
National Treasurer Of NCP : सुनिल तटकरे यांनी या आधी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. त्यानंतर आता त्यांच्याकडे नवीन जबाबदारी आली आहे.
मुंबई: सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्षपदावर नेमल्यानंतर आता सुनिल तटकरे यांना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय खजिनदारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रीय खजिनदार पदासोबत सुनिल तटकरे यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्या नियुक्तीचे पत्र जारी करण्यात आलं असून त्यामध्ये ही घोषणा करण्यात आली आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची यशस्वी धुरा सांभाळल्यानंतर खासदार सुनिल तटकरे यांना ही नवीन जबाबदारी देण्यात आली असून ही त्यांच्या कामाची पोचपावती असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने माननीय खा. सुनील तटकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.@SunilTatkare pic.twitter.com/TUp07BPLAi
— NCP (@NCPspeaks) June 12, 2023
राष्ट्रवादी काँग्रेसचा 24 वा वर्धापन दिन राज्यासह देशभरात साजरा करण्यात आला. याचवेळी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्याध्यक्षपदी खासदार प्रफुल पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर आता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांची राष्ट्रीय खजिनदारपदी नियुक्ती जाहीर केली आहे.
राष्ट्रवादीत दोन कार्यकारी अध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्षपदी नेमण्यात आल्याची घोषणा शरद पवार यांनी केली होती. गेल्या महिन्यात शरद पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी राजीनामा मागे घेतला. पण त्यांनी पक्षामध्ये आता दोन कार्यकारी अध्यक्षपद नेमले आणि भाकरी फिरवल्याची चर्चा सुरू झाली. सध्या शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. पण सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नेमून त्यांनी राजकीय वारसाचे संकेत दिल्याचीही चर्चा आहे.
राष्ट्रवादीत कुठल्या कार्याध्यक्षांकडे काय जबाबदारी
प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा आणि राज्यसभा कामकाजाची जबाबदारी असणार आहे. सोबत आर्थिक घडामोडींचे अध्यक्षही म्हणून त्यांना जबाबदारी आहे. तर सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, महिला, युवा, विद्यार्थी संघटना आणि लोकसभेच्या कामकाजाची जबाबदारी आहे. सुप्रिया सुळे केंद्रीय निवडणूक अधिकार समितीच्या अध्यक्षही असणार आहेत. साहजिकच महाराष्ट्रातल्या निर्णयांमध्ये यानिमित्तानं सुप्रिया सुळेंचा अधिकार चालताना दिसू शकतो.
ही बातमी वाचा: