देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची वकिली का करताहेत? : नवाब मलिक
देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उत्तर दिलं आहे. राजेश डोकानियाला बोलावल्यानंतर संपूर्ण राज्यातील भाजप का घाबरते? सगळा भाजप त्यांच्या वकिलीसाठी का जात आहे? फडणवीस वकील आहेत, ते वकीलपत्र घेऊन बाजू मांडत होते? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
मुंबई : रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरुन शनिवारपासूनच केंद्र विरुद्ध राज्य अशी लढाई सुरु होती. नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर आरोप केल्यानंतर केंद्र सरकारनेही नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिलं. पण ही लढाई शनिवारी रात्री थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली. ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकावर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. एका मंत्र्यांच्या सीओडींनी फोन केल्यानंतर पोलिसांकडून ही कारवाई केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीसांच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उत्तर दिलं आहे. राजेश डोकानियाला बोलावल्यानंतर संपूर्ण राज्यातील भाजप का घाबरते? सगळा भाजप त्यांच्या वकिलीसाठी का जात आहे? फडणवीस वकील आहेत, ते वकीलपत्र घेऊन बाजू मांडत होते? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
नवाब मलिक बोलताना म्हणाले की, "देशामध्ये सात कंपन्यांना रेमडेसिवीरच्या देशांतर्गंत वाटप आणि विक्रीची परवानगी मिळाली आहे. दोन कंपन्यांना पदरेशात विक्रीची परवानगी आहे. त्याउलट 7 कंपन्यांना उत्पादनाची परवानगी आहे. निर्यातीवर बंदी घातल्यानंतर काही कंपन्या आमच्याकडे साठा उपलब्ध आहे. आम्हाला विकण्याची परवानगी द्या, यासाठी राज्य सरकारकडे मागणी करत आहेत. ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया हे स्वत: अन्न आणि औषध मंत्री शिंगणे आणि प्रवीण दरेकर यांना भेटले. त्यांनी माहिती दिली की, माझ्याकडे रेमडेसिवीरचा साठा आहे, मला परवानगी दिली तर हा साठा देऊ शकतो, अशी माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडे औषधांचा साठा आहे, त्या आधारे राजेश डोकानिया यांना बोलावून माहिती गोळी केली जात होती."
"देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड हे सर्वजण रात्री सव्वा अकरा वाजता बीकेसीला पोहोचले. जर पोलिसांना माहिती मिळाली तर पोलीस त्यासंदर्भातील चौकशी करतात. मग या डोकानियाला सोडवण्यासाठी या राज्याचे दोन-दोन विरोधी पक्षनेते आणि आमदार का गेले? रेमडेसिवीरचा साठा स्वतः कडे घेण्यासाठी आणि साठा सरकायला देऊ नका अशी भूमिका भाजप नेत्यांची आहे. साठा देऊ शकतात त्यांना ऑर्डर द्या अशी भूमिका घेत आहेत. पण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर जेव्हा एखाद्या व्यक्तीला बोलावल्यानंतर हे नेते का जातात हा मोठा प्रश्न आहे. राजेश डोकानीया यांची चौकशी करुन त्यांना सोडून देण्यात आलं आहे. तसेच त्यांना पुन्हा गरज भासल्यास चौकशीसाठी बोलावण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.", असं नवाब मलिक म्हणाले.
पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले की, "पोलीस यंत्रणा जनतेसाठी काम करते, पोलीस यंत्रणा काळा बाजार रोखण्यासाठी काम करते. पण डोकानियाला बोलावल्यानंतर संपूर्ण राज्यातील भाजप का घाबरते? सगळा भाजप त्यांच्या वकिलीसाठी का जात आहे? फडणवीस वकील आहेत, ते वकीलपत्र घेऊन बाजू मांडत होते? की त्यांचे संबंध आहेत म्हणून त्यांची बाजू मांडत होते? जर महाराष्ट्राच्या हितासाठी पोलीस यंत्रणा, एफडीए काम करत असेल आणि चौकशीसाठी बोलावलं असेल तर भाजपाचे प्रमुख नेते तिकडे जातात, यावरुन काय संबंध आहेत हा खुलासा केला पाहिजे."
"तुम्ही ट्वीट करुन 50 हजारांचा साठा आम्ही वाटणार आहे असं सांगता. पण सरकार मागतं तेव्हा ते लोक देत नाहीत, मग त्याच्या मागे काय राजकारण आहे? हे भाजपने स्पष्ट केलं पाहिजे. ज्यांनी साठा ठेवला त्यांना चौकशीसाठी बोलावलं आणि नंतर भाजप नेते वकिलीसाठी पोलीस ठाण्यात जातात, यात काहीतरी गडबड आहे, हे योग्य नाही, हे त्यांना शोभत नाही. विरोधी पक्षनेता फोनवरुन माहिती घेऊ शकतो, वरिष्ठांशी चर्चा होऊ शकते. पोलीस ठाण्यात जाऊन वकिली करणं काय राजकारण आहे माहिती नाही." , असं नवाब मलिक म्हणाले.
काय आहे पार्श्वभूमी?
भाजपचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड हे पाच दिवसांपूर्वीच या कंपनीत जाऊन भेट देऊन आले होते. प्रदेश भाजपला 50 हजार रेमडेसिवीरची इंजेक्शने देण्याची तयारी या कंपनीने दाखवली होती. ही इंजेक्शने महाराष्ट्र सरकारला देण्याचे या दोन्ही नेत्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर आज सकाळी रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठ्यावरून केंद्र विरुद्ध राज्य असा सामनाही रंगला होता. पण मध्यरात्री हा वाद थेट पोलीस स्थानकात पोहोचला. त्यानंतर भाजपला इंजेक्शनचा साठा कसा देता? यावरून मंत्र्यांच्या ओएसडीकडून Bruck Pharma कंपनीच्या लोकांना धमकावल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली होती. फडणवीसांच्या आरोपानंतर आता नवाब मलिकांनी प्रत्युत्तर देत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Remdesivir injection : रेमडेसिवीर इंजेक्शनवरून हाय व्होल्टेज ड्रामा; मध्यरात्री देवेंद्र फडणवीस पोलीस ठाण्यात
- रेमडेसिवीरसाठी केंद्राकडून महाराष्ट्राला दुजाभाव? नवाब मलिक-प्रवीण दरेकरांचं जोरदार ट्विटरवॉर! - काय आहे नेमका वाद?
- वर्ध्यातील 'जेनेटेक लाईफ सायन्सेस'ला रेमडेसिवीर बनवण्याची परवानगी, आठवड्याला 30 हजार कुपींची निर्मिती करणार