(Source: ECI/ABP News/ABP Majha)
केंद्राकडून शरद पवारांना पद्म पुरस्कार, मात्र देवेंद्र फडणवीसांना त्याचा विसर; सुप्रिया सुळे यांची टीका
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल वक्तव्य करताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे विसरले की त्यांच्याच केंद्र सरकारकडून शरद पवार यांना पद्म पुरस्कार दिला होता, अशी टीका सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली.
पुणे : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल वक्तव्य करताना हे विसरले की त्यांच्याच केंद्र सरकारकडून शरद पवार यांना पद्म पुरस्कार दिला होता, असा खोचक टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांसोबत संवाद साधाला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ''पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याबरोबर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पुण्याचे पलकमंत्री अजित पवार, पुण्यातील सर्व खासदार, आमदार आणि शरद पवार उपस्थित राहणार आहेत. यासाठी खासदार गिरीश बापट आणि शरद पवार यांची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली आहे"
महाराष्ट्रातील शाळांबाबत राजेश टोपेंबरोबर बोलणार
सुप्रिया सुळे यांनी यावेळी महाराष्ट्रातील बंद असलेल्या शाळांबाबतही आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, "माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की सरसकट शाळा बंद करणे योग्य आहे का? हिवरे बाजार आणि इतर ठिकाणी शाळा सुरु राहिल्याचे आपण पाहिले आहे. तेथे मुलांना कोणतीही इजा झालेली नाही. मी याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत बोलणार आहे"
महाराष्ट्र छेडछाड मुक्त व्हावा
महाराष्ट्र राज्य छेडछाड मुक्त राज्य व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. याबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत माझे बोलणे झाले आहे.
अजित पवारांचे अभिनंदन
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मी अभिनंदन करते. कारण त्यांनी राज्य मागासवर्गीय आयोगाला निधी उपलब्ध करुन दिला. केंद्र सरकारकडून अपेक्षा आहे की त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू मांडावी, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
राजकीय पोस्ट लिहिल्यामुळे मालिकेतून बाजुला करण्यात आलेले अभिनेते किरण माने यांच्याबद्दल माध्यमांतून वेगवेगळी माहिती मिळत आहे. खासदार अमोल कोल्हे याबाबत बोलतील, असे या प्रकरणी सुप्रिया सुळे म्हणाल्या.
उत्तर प्रदेशात फक्त जाहिरातबाजी
उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि जयंत चौधरींकडे आम्ही अपेक्षेने पाहत आहोत. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारकडून अपेक्षित काम झालेले नाही. मात्र त्यांची जाहिरात खूप झाली, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.
महत्वाच्या बातम्या