बिरोबा बनात येऊन बिरोबाच्या खोट्या शपथा घेतल्या तर त्याचं पार वाटोळं होतं, जयंत पाटलांचा पडळकरांना टोला
बिरोबा बनात येऊन बिरोबाच्या खोट्या शपथा घेतल्या तर त्याचं पार वाटोळं होतं, असे म्हणत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बिरोबाच्या बनातच आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांना टोला लगावला.
सांगली : आरेवाडीतील बिरोबा देवस्थान जागृत आहे. बिरोबाचा आशीर्वाद घेतल्यावर बऱ्याच गोष्टी चांगल्या देखील होतात. मात्र बिरोबा बनात येऊन बिरोबाच्या खोट्या शपथा घेतल्या तर त्याचं पार वाटोळं होतं, अशा शब्दात मंत्री जयंत पाटील (NCP Leader Jayant Patil) यांनी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना टोला लगावला आहे. गोपीचंद पडळकर यांनी बिरोबा देवाच्या घेतलेल्या शपथेची आठवण करून देत जयंत पाटील यांनी बिरोबाच्या बनातच पडळकर यांना टोला लगावला.
कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव भागातील टेंभू सिंचन योजनेच्या जल पूजन कार्यक्रम प्रसंगी जयंत पाटील यांनी पडळकर यांनी हा टोला मारला. आरेवाडीमधील बिरोबाच्या बनात हा जल पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर भाजपचे खासदार संजय पाटील, आमदार सुमनताई पाटील उपस्थित होत्या.
भाजप पक्ष सोडून पुन्हा स्वपक्षात जाण्याची इच्छा असलेले अनेक कार्यकर्ते
परवाच एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी भाजप पक्षाचा अनुभव घेतल्यानंतर भाजप पक्ष सोडून स्वपक्षात जाण्याची इच्छा असलेले अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रमध्ये आहेत, असं म्हटलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की, मराठवाड्यातील तर औरंगाबाद, जालना परभणी, बीड, भागातील अनेक छोटे-मोठे कार्यकर्ते हे राष्ट्रवादी मध्ये येण्यास इच्छुक असून त्यांचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
भाजप पक्षाचा अनुभव घेतल्यानंतर भाजप पक्ष सोडून स्वपक्षात जाण्याची इच्छा असलेले अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये आहेत. या लोकांचे राष्ट्रवादीत स्वागत करण्यासाठी लवकरच त्या त्या भागात दौरा काढणार असल्याचेही जयंत पाटील म्हणालेत. विविध राजकीय पक्षांतील नेत्यांचे भाजपमध्ये स्वागत केले जाते पण या नेत्यांना त्या पक्षात ना कधी मान मिळतो ना भाजपच्या कोअर समितीत त्यांना प्रवेश मिळतो.त्यामुळे असे अनके कार्यकर्ते ,नेते पुन्हा आपल्या पक्षात येण्यास इच्छुक असून त्याच्या प्रवेशासाठी आपण येत्या काही दिवसात दौरा काढणार असल्याचे जयंत पाटील म्हणालेत.