Jayant Patil : अधिवेशन संपलं तरी शेतकऱ्यांना मदत नाही, हे सरकार असंवेदनशील : जयंत पाटील
Jayant Patil : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे असंवेदनशील असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यंनी केलं.
Jayant Patil : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे असंवेदनशील असून, त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्यास वेळ नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यंनी केलं. अवकाळी पावसामुळं (Rain) राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, त्यांना अद्याप मदत झाली नसल्याचे पाटील म्हणाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिवेशनात मदत जाहीर केली जाईल अशा घोषणा करत मंत्री राज्यभर फिरले. मात्र अधिवेशन संपले तरी सरकारनं शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली नसल्याचे पाटील म्हणाले. हे अधिवेशन पूर्ण उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर टीका करण्यातच खर्ची घातल्याचे चित्र दिसल्याचे पाटील म्हणाले.
विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जातेय
राज्यातील सरकार फक्त आणि फक्त आश्वासनांच्या पलीकडे काही करत नसल्याची टीका जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षांतर्गत पक्ष संघटना बांधणीसाठी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. आज सकाळी ते नंदुरबारमध्ये आले होते. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली. राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या मुद्यावरुनही पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचे पाटील म्हणाले.
मालेगाव मतदारसंघात उद्धव ठाकरेंना लोकांचा मोठा पाठिंबा
आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे मालेगावमध्ये जाहीर सभा घेत आहेत. या मतदारसंघात त्यांना लोकांचा मोठा पाठिंबा असल्याचे जयंत पाटील म्हणाले. या सभेच्या माध्यमातून हा लोकांचा पाठिंबा नक्की व्यक्त होईल. लोकांना ओढून आणावं लागत नाही ते स्वतःहून येतात हे त्यांच्या सभेचे वेगळेपण असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
वारंवार मागणी करुनही शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही
दरम्यान, काल (25) राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाची सांगता झाली. 27 फेब्रुवारीपासून अधिवेशन सुरु झाले होते. या अधिवेशनात शेतकरी प्रश्नासह विविध मुद्यांवरुन विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी जोरदार मागणी केली होती. मात्र, अद्याप सरकारनं शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही. या मुद्यावरुन जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सरकारमधील मंत्र्यांनी अधिवेशनात मदत जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, त्यांनी कोणत्याही प्रकारची मदत जाहीर केली नसल्याचे पाटील यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: