एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदाच भगवानगडावर, स्वागताची जय्यत तयारी
भौगोलिकदृष्ट्या नगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या भगवानगडाचा बीडच्या राजकारणावर कायमच प्रभाव राहिला आहे. या गडावरुन दिलेला संदेश हा केवळ बीड जिल्ह्यातच नाही तर नगर, नाशिक, बुलढाणा या जिल्ह्याच्या राजकारणावरही परिणाम करु शकतो.
बीड : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आज भगवानगडावर जाणार आहेत. मंत्री झाल्यानंतर मुंडे पहिल्यांदाच भगवान गडावर जातील. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना मंत्री झाल्यावर भगवानगडावर दर्शनासाठी बोलावलं होतं. आज ते नारायणगड, भगवानगड आणि गहिनीनाथगडावर जाऊन महंतांचे आशीर्वाद घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर तिन्ही गडावर धनंजय मुंडे यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
गोपीनाथ मुंडे यांचं शक्तिस्थळ असलेला भगवानगड हा कायमच राजकारणाची दिशा ठरवणारा राहिला आहे. म्हणूनच याच भगवानगडावरुन दिलेला राजकीय संदेश हा वंजारी समाजातील राजकीय निर्णयाचा दिशादर्शक असायचा. गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीतले जवळपास सगळे मोठे निर्णय याच भगवानगडावरुन पहिल्यांदा जाहीर केले होते.
याच भगवानगडावर येण्याचे निमंत्रण महंत नामदेव शास्त्री यांनी नुकतेच मंत्री झालेल्या धनंजय मुंडे यांना दिले आहे. यापूर्वीच महंतांनी जाहीर केल्याप्रमाणे यापुढे भगवान गडावर राजकीय भाषण होणार नाही. कदाचित दसरा मेळावा सुद्धा होणार नाही. मात्र आता या परिस्थितीत धनंजय मुंडे यांच्यासोबत भगवानगड उभा ठाकतोय हा संदेश त्यांच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा आहे.
घटना सात वर्षापूर्वीची असेल ज्यावेळी धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांच्यापासून विभक्त झाले. त्यावेळी भगवान गड गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहिला होता. एवढेच नाही ज्या ज्यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात वंजारी समाजातील राजकीय नेते गेले, त्यावेळीही भगवान गडाने कायम गोपीनाथ मुंडे यांची साथ दिली.
गोपीनाथ मुंडेंपासून वेगळे झाल्यावर धनंजय मुंडे हे स्वतःला 'मी वेल आहे', असं म्हणाले होते. त्यावर याच भगवानगडावरुन निरुपण करताना महंत नामदेवशास्त्री यांनी 'झाड झाड असतं आणि वेल वेल असते, वेल ही झाडावर वाढत असते आणि त्यामुळे वेलीने झाडाला फास टाकायचा नसतो,' असे म्हटले होते.
गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर नामदेवशास्त्री यांनी पंकजा मुंडे याच गोपीनाथ यांच्या राजकीय वारसदार असतील असे जाहीर केले होते. पंकजा मुंडे यांना भगवानगडाने लेक मानले होते. त्यानंतर नामदेव शास्त्रींनी भगवानगडावर राजकीय भाषण होणार नाही अशी भूमिका घेतली. यामुळे पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यामधला संघर्ष सुरु झाला.
आधी गोपीनाथ गडाची निर्मिती आणि तीन वर्षांपूर्वी भगवान गडाला आव्हान देत पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तीगड निर्माण केला. या सगळ्या घडामोडींमध्ये धनंजय मुंडे यांची भूमिका ही महंत नामदेवशास्त्री यांच्या सोबतच राहिली. ती कधी जाहीरपणे मांडून तर कधी शांत राहून धनंजय मुंडे भगवानगडाच्या जवळ-जवळ पोहोचत होते.
धनंजय मुंडे यांना याच भगवान गडावर पोहचण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. धनंजय मुंडे यांच्या गाडीवर दगडफेक सुद्धा झाली होती. त्याच धनंजय मुंडे यांचं स्वागत करण्यासाठी आता भगवानगड सज्ज झाला आहे. यापुढे भगवानगडावर राजकीय भाषण होणार नाही असे महंतांनी जाहीर केले असले किंवा यापुढे दसरा मेळावा ही भगवानगडावर होणार नसला तरी धनंजय मुंडे यांच्यासोबत भगवानगड आहे हा संदेश एका समाजाचे नेतृत्व सिद्ध करणारा असेल हे मात्र नक्की.
Dhananjay Munde | मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदाच भगवानगडावर जाणार | ABP Majha
Mahant Namdev Shastri | भगवानगडावरील राजकारण संपलं आहे : महंत नामदेव शास्त्री | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
पुणे
मुंबई
निवडणूक
Advertisement