राज्य सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न; आव्हाडांवरील कारवाईवरून अजित पवारांचा आरोप
Jitendra Awhad : अशा कारवाया करून जितेंद्र आव्हाड यांना अडकवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. राज्य सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलाय.
मुंबई : "जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट केल्यानंतर आम्ही त्यामगचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला. 72 तासात राज्याच्या माजी मंत्र्यावर दोन-दोन गुन्हे दाखल होतात. यातून नाराज होऊन जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्याचं म्हंटलं होतं. परंतु, जे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, त्यातून विनयभंग झाल्याचे कोठेही दिसत नाही. घटना घडलेल्या ठिकाणी मुख्यंमत्री स्वत: उपस्थित होते. त्यांनी पोलिसांना सांगावं की असं काही घडलं नाही म्हणून. पण अशा कारवाया करून जितेंद्र आव्हाड यांना अडकवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. राज्य सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मुंब्रा-कळवा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोलिसांनी भारतीय दंड विधान 354 (विनयभंग) अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर आव्हाड यांनी आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर अजित पवार यांनी आव्हाड यांच्या निवास्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोघांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवार यांनी आव्हाडांवरील आरोप फेटाळून लावले.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कोठेही आक्षेपार्ह दिसलं नाही. परंतु, जाणून बुजून अशा कारवाया करण्यात येत आहेत. संपूर्ण महाविकास आघाडी जितेंद्र आव्हाड यांच्या पाठिशी आहे. राज्यातील लोकशाही टिकली पाहिजे. येणाऱ्या परिस्थितीविरोधात आम्ही लढा देऊ. चूक असेल तर नक्की कारवाई करा, पण जर जनमानसात प्रतिमा मलिन करण्यासाठी अशा कारवाया केल्या जात असतील तर हे लोकशाहीसाठी खूप घातक आहे, अशी खंत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
"सरकार बदललं आहे म्हणून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही अतीशय लाजीरवाणी गोष्ट आहे. असे प्रकार यापूर्वी महाराष्ट्रात कधीही झाले नाहीत. सरकार येत असतं, सरकार जात असंतं. कोणीच तेथे कायम बसायला गेलं नाही. त्यामुळे अशा कारवाया करू नये. मुख्यमंत्री स्वत: तेथे होते, त्यांनी सांगावं की असं काही घडलयं की नाही. शिवाय एक वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील तेथे उपस्थित होते, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, "अशा कारवाया करून राज्यातील कायदा आणि राज्यघटनेला तिलांजली देण्याचं काम करण्यात येतंय. चित्रपट बंद पाडताना मारहाण झालेला तरूण देखील म्हणत आहे की, जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे मी वाचलो. तरी देखील जितेंद्र आव्हाडांसह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, कोर्टाने लगचे त्यांना जामीन दिला. त्यानंतर आता दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. परंतु, या सर्वांमागचा सूत्रधार कोण आहे? याचा शोध घेतला पाहिजे."
"अशा कारवाया म्हणजे एक षडयंत्र आहे. अशी षडयंत्र रचून राज्यात वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होत असेल तर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून यातील वस्तूस्थिती समजून घेतली पाहिजे. कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून कायदे केले जातात. परंतु, कायद्याचा आधार घेऊन जर कोणावर अन्याय होत असेल तर ते योग्य नाही. पोलिस दबावाखाली वागत आहेत" असा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला.