Jayant Patil: जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार? भाजपकडून व्हीडिओ ट्वीट; चर्चांना उधाण
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षाला रामराम करणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहे.
NCP Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षाला रामराम करणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचे वक्तव्य करत याला आणखी हवा दिली होती. आता महाराष्ट्र भाजपच्या खात्यावर जयंत पाटील यांच्याविषयी एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. त्यामध्ये जयंत पाटील राष्ट्रवादी सोडण्याची कारणे सांगितली आहेत. जयंत पाटील राष्ट्रवादी सोडण्याची एक नव्हे दहा कारणे असल्याचा दावा भाजपने केला आहे.
भाजपने पोस्ट केलेल्या व्हिडीओत काय म्हटलेय?
शरद पवारांनी जे काही निवृत्ती नाट्य रंगवले होते, त्यामध्ये शरद पवार यांच्या व्यतिरिक्त बेस्ट परफॉर्म केले ते जयंत पाटलांनी... किती रडले होते ते... पण आता जाणवते ते आश्रू खरे होते फक्त कारण वेगळे होते. म्हणूनच जयंत पाटील पक्षातून बाहेर पडणार ? अशी कुजबूज सुरु झाली आहे. जयंत पाटलांकडे पक्षातून बाहेर पडण्यासाठी एक नाही तर दहा कारणे आहेत.
2019 पासून शरद पवार यांनी जयंत पाटलांना डावलायला सुरुवात केली. कधीकाळी गृह मंत्रालय भूषवणाऱ्या पाटलांना जलसंधारण मंत्रालय देऊन नाचक्की केली. त्यात राष्ट्रवादीमध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार असे दोन गट.. अन् पाटील याही गटातले नाहीत अन् त्याही गटातील नाहीत. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीतले भविष्य अंधारातच राहिले. जयंत पाटील मुळातच महत्वाकांक्षी... आता हेच पाहा ना, त्यांना पडणारी उप मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने कुणापासून लपून राहिली नाहीत. आता तर पक्षाचा राष्ट्रीयत्वाचा मानही गेला. सुप्रिया सुळे अध्यक्षपदी आल्यामुळे अजित पवारांचेच वांदे झाले. तेव्हा यांच्या स्वप्नाला कोण विचारणार ? महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर त्यांना विरोधी पक्षाचे नेतेपद भूषवायचे होते, तेव्हाही त्यांची झोळी रितीच राहिली.
कार्यकारी अध्यक्ष निवडताना शरद पवारांनी दोन्ही गटाला समाधानी केले. सुप्रिया सुळे यांना आणि अजित पवार यांचे समर्थक अशी ओळख असणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष बनवले. जयंत पाटलांना फक्त ठेंगा मिळाला. राज्याचे सर्व निर्णय अजित पवार घेतात आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय राजकारणाची धुरा शरद पवारांच्या हातात आहे. त्यामुळे जयंत पाटील नाममात्र प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यात शरद पवार चुकून कधी निवृत्त झालेच, तर स्वत:ला वरिष्ठ समजणाऱ्या जयंतरावांना सुप्रिया सुळे आणि अजितदादांच्या हाताखाली काम करणे कठीण होईल. जयंत पाटालांना आता शरद पवारांसारखेच आपल्या मुलाला राजकारणात आणायचे आहे. नुकताच त्यांचा मुलगा प्रतिक जयंत पाटील याला राजाराम बापू साखर कारखान्याचा अध्यक्ष म्हणून निवडून आणले. पण इथे स्वत:च्या सख्या पुतण्याला डावलणारे पवारसाहेब जयंतरावांच्या मुलाला थोडेच पुढे येऊ देणार...?
पाहा व्हिडीओ
जयंत पाटील राष्ट्रवादी सोडण्याची प्रमुख १० कारणे. pic.twitter.com/DqedwvkoBf
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 24, 2023
भाजपने पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर राष्ट्रवादीकडून अद्याप कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही. भाजपच्या या व्हिडीओला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर दिलेय. जयंत पाटील तुमच्या गोठ्यातले नाराज असलेले कधी राष्ट्रवादी मध्ये घेऊन गेले हे पण नाही कळणार.... जयंत पाटीलांच्या नादी तर लागुनच नका, असे रिट्विट करत एका युजरने म्हटलेय.
संजय शिरसाट काय म्हणाले ?
“जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत. लवकरच ते मार्गक्रमण करतील,” असं मोठं विधान संजय शिरसाट यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना केले होते. “राष्ट्रवादी काँग्रेसला आमचा का पुळका आला, हे मला कळायला मार्ग नाही. जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत. ज्या पक्षाची स्थापन मुळात गद्दारीतून झाली, ते आम्हाला गद्दारीची भाषा शिकवत आहेत. हे सर्व हास्यास्पद आहे. याची चिंता आम्ही करत नाही, असे शिरसाट म्हणाले होते”