जो पक्ष उभारला आता तोच पक्ष हातून गेला, आता शरद पवारांकडे कोणता पर्याय?
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवारांना दिले आहे. तसेच शरद पवार गट हा स्वतंत्र्य गट असल्याचं देखील यावेळी निवडणूक आयोगाने म्हटलं.
मुंबई : राष्ट्रवादी (NCP) पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांकडे (Ajit Pawar) निवडणूक आयोगनाने (Election Comission) दिले आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या (Sharad Pawar) हातून राष्ट्रवादी पक्ष गेला असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे आता शरद पवारांना नवं चिन्ह शोधावं लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून तयारी देखील सुरु करण्यात आली होती. जर निवडणुक आयोगाचा निर्णय आपल्या बाजूने नाही आला तर पक्षाच्या चिन्ह काय असणार यासंदर्भात शरद पवार गटाची बैठक देखील पार पडली होती.
या बैठकीमध्ये शरद पवारांनी चिन्हाची यादी देखील केली होती. त्यामुळे आता शरद पवार लवकरच त्यांच्या पक्षाचं नव नाव आणि चिन्ह जाहीर करतील असं सांगण्यात आलं आहे. जो न्याय निवडणूक आयोगाने शिवसेना दिला होता, तोच आता राष्ट्रवादीला दिला आहे. त्यामुळे आगामी येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये शरद पवार कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शरद पवार गटाला नवं चिन्ह आणि नाव निवडावं लागणार
निवडणूक आयोगाने हा निकाल दिल्यानंतर शरद पवारांकडे दोन पर्याय आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयावर शरद पवार सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात किंवा आता शरद पवारांना पक्षासाठी नवं नाव आणि चिन्ह शोधावं लागणार आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या निकालावर आता शरद पवार काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिंदे गटाचा न्याय दादांच्या राष्ट्रवादीला
राष्ट्रवादीच्या आधी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद हा निवडणूक आयोगासमोर होता. त्यावेळी आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाचं असल्याचं सांगत तेच खरी शिवसेना असल्याचं स्पष्ट केलं.
शिवसेनेत ज्या काही घडामोडी घडल्या त्याच पद्धतीने घडामोडी या नंतरच्या राष्ट्रवादीमध्ये घडल्या. अजित पवारांनी भाजपला साथ दिल्यानंतर बहुतांश आमदार हे त्यांच्यासोबत गेले आणि राष्ट्रवादीचा वाद हा निवडणूक आयोगामध्ये पोहोचला.