Sharad Pawar : सुटबुट घातलेल्यांना खुर्ची पण लंगोटवाल्या शेतकऱ्यांना बँका साधं विचारतही नाहीत : शरद पवार
सुटबुट घातलेल्या व्यक्तीला खुर्ची पण लंगोटवाल्या शेतकऱ्यांना बँका साधं विचारतही नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
Sharad Pawar : शेतकऱ्यांना एकत्रित करुन त्यांच्या जीवनात बदल व्हावा, यासाठी प्रयत्न व्हायला पाहीजेत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. येणाऱ्या काळात ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. सहकारी चळवळीचे प्रश्न मांडण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. देशात सहकार चळवळीत महाराष्ट्र आणि गुजरातचा वाटा मोठा असल्याचे ते म्हणाले. सुटबुट घातलेल्या व्यक्तीला खुर्ची पण लंगोटवाल्या शेतकऱ्यांना बँका साधं विचारतही नसल्याचे पवार यावेळी म्हणाले.
नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. नांदेडमध्ये गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीच्या 'सहकारसूर्य' मुख्यालयाचे उद्घाटन यावेळी शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी शरद पवारांनी उसाच्या संदर्भातही वक्तव्य केलं. शेतकऱ्यांनी हार्वेस्टरच्या सहाय्याने उसाची तोडणी करावी, यांत्रिकीकरणचा अवलंब करावा असेही पवार म्हणाले.
नितीन गडकरींचं पवारांनी केलं कौतुक
सहकारी बँकेकडे रिझर्व बँकेचा दृष्टिकोन सहकार्याचा असणे गरजेचे आहे. कारण या बँका लहान माणसाला आर्थिक शक्ती देणाऱ्या नाड्या आहेत. सहकारी चळवळीचे प्रश्न मांडण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असल्याचे पवार यावेळी म्हणाले. याबाबतीत नितीन गडकरी यांची भूमिका नेहमीच सहकार्याची असते असेही पवार म्हणाले. कोणताही संस्था मजबूत करण्यासाठी घेतलेला पैसा वेळेत परत होणे गरजेचे असते. सहकारी संस्थाकडून घेतलेले पैसे वेळेवर, व्याजसह परत देणे गरजेचे असल्याचे पवार यावेळी म्हणाले.
नांदेड जिल्ह्यात ड्रायकोर्ट तयार करुन शेतकऱ्यांच्या पिकाला बाजारपेठ उपलब्ध करुन घ्यावी असेही शरद पवार यावेळी म्हणाले. घरातील सगळ्यांनी शेतात काम करणे यावर विचार केला पाहिजे. पर्याय शोधला पाहिजे. आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असेही पवार यावेळी म्हणाले. नांदेडच्या गोदावरी काठी गुरुगोविंद सिंगांचे वास्तव्य होते. त्यामुळे नांदेडचा लौकिक आहे. अगोदर गोदावरी, गुरुगोविंद सिंग यांच्यामुळे, MGM शिक्षणसंस्थेमुळे आणि आता गोदावरी बँकेमुळे लौकिक वाढेल असेही पवार म्हणाले. या बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थकारण सुधारणेसाठी मदत होईल. उसाचे पीक, सोयाबीन, हळद पिके याभागात घेतली जातात. परदेशात पाठवलेल्या साखरेतून वर्षाकाठी 40 हजार कोटी मिळतात. एकट्या उसापासून इथेनॉल, साखर, अल्कोहल, वीज निर्मिती होते असेही पवार म्हणाले. तसेच हळद संशोधनाबाबत धोरण ठरवावे. शेतकऱ्यांचा भार कमी करण्यसाठी छोटे मोठे व्यवसाय करायला हवेत. देशात सहकार चळवळीत महाराष्ट्र आणि गुजरातचा वाटा मोठा असल्याचे पवार यावेळी म्हणाले.