तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री, चुकत असेल तर नोट वाचून बोला... घोटाळा करुन सत्तेत आलेले बोलताना घोटाळा करतात; अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना टोला
Ajit Pawar On Eknath Shinde : हे घोटाळा करुन सत्तेत आलेले मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे बोलतानाही यांचा घोटाळा होतोय असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar On Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाषण करताना भंबेरी उडते, ते राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना पंतप्रधान म्हणतात, लोकसेवा आयोगाला निवडणूक आयोग म्हणतात अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. तुम्ही एका राज्याचे मुख्यमंत्री आहात, चुकत असेल किंवा माहिती नसेल तर नोट (Note) काढून ती वाचा, त्यावर काहीही बिघडत नाही असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे हे घोटाळा करुन सत्तेत आले आहेत, त्यामुळे बोलतानाही त्यांचा घोटाळा होतो. राष्ट्रपतींना ते कधी पंतप्रधान म्हणतात. हे सरकार दगा-फटका देऊन सत्तेत आलं, जनता यांना धडा शिकवणार.
अजित पवार म्हणाले की, अलिकडच्या काळात वाचाळविरांची संख्या वाढली आहे. कोणीही काहीही बोलतोय. या प्रकारचा कारभार हा राज्य सरकारचा सुरू आहे. राजू शेट्टी यांनी सांगितलं की प्रशासनामध्ये बदल्यांचे दर ठरले आहेत. प्रत्येक टेंडर हे मंत्रालयातून ठरतात. हे त्या-त्या महापालिकांना परवडणाऱ्या नाहीत
अजित पवार म्हणाले की, मुंबईचं मराठीपण टिकवण्यामध्ये, त्याचा मानसन्मान हा टिकवला तो बाळासाहेब ठाकरेंनी. मराठी माणून एकजुटीनं राहिला तो त्यांच्यामुळे. ही एकी काहीजणांच्या डोळ्यात खुपत होती. शहिदांच्या बलिदानातून ही मुंबई महाराष्ट्राला मिळालं आहे. आपण एकजूट राहून या सर्वांशी मुकाबला करण्याची गरज आहे.
राज्यातील कायदा व्यवस्था बिघडली
अजित पवार म्हणाले की, कोयता गँग आणि इतर गुन्हेगारांमध्ये मस्तवालपणा आला आहे. त्यावर सरकार काही करत नाही. राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. त्यावर शिंदे-फडणवीस सरकार काहीही करत नाही. राज्यावर अजूनही अवकाळीचं संकट आहे, पण तरीही सरकार शेतकऱ्यांना दिलासा देत नाही. दहा महिने झाले तरी राज्य सरकार महापालिका आणि इतर निवडणुका जाहीर करत नाही. निवडणुका जाहीर झाल्यावर लोक काय करतील याबद्दल शिंदे-फडणवीस सरकार घाबरत आहे. सरकार निवडणुका घ्यायला का घाबरत आहे?
हे सरकार दगाफटका करून सत्तेत आलं असून राज्यातील जनता ही त्यांना धडा शिकवणार असल्याचं अजित पवार म्हणाले. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नपुंसक म्हटलं, तरी यांना जनाची नाही तर मनाचीही लाज नाही. चिथावणीखोर वक्तव्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची खरडपट्टी काढली, पण त्यांना काहीच वाटत नाही.
ही बातमी वाचा :