नवाब मलिकांवरील ईडी कारवाई, सत्ताधारी-विरोधकांचे परस्पर विरोधी आंदोलन, महत्वाचे 10 मुद्दे
Nawab Malik ED : नवाब मलिक यांच्या अटकेच्या कारवाईचा निषेध करत महाविकास आघाडी सरकारने राज्यभरात आंदोलन पुकारले आहे. तर नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपही आक्रमक झाले असून राज्यभरात आंदोलन पुकारले आहे.
Nawab Malik ED : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. नवाब मलिक यांच्या अटकेच्या कारवाईचा निषेध करत महाविकास आघाडी सरकारने राज्यभरात आंदोलन पुकारले आहे. तर नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपही आक्रमक झाले असून राज्यभरात आंदोलन पुकारले आहे.
नवाब मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन, मंत्री-आमदार मंत्रालयाबाहेर
मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या विरोधात महाविकास आघाडीकडून मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. सकाळी दहा वाजता महात्मा गांधी पुतळ्याजवळ महाविकास आघाडीतील नेते आंदोलनाला बसले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मत्स्य विकास मंत्री अस्लम शेख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना आमदार यामिनी जाधव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, राज्यमंत्री अदिती तटकरे, शिवसेना नेते सचिन अहिर, महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह आदी नेते आंदोलनाला उपस्थित होते.
शिवसेनेविषयी संभ्रम?
नवाब मलिकांना अटक केल्याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारने राज्यभरात आंदोलन पुकारले. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेने कार्यकर्त्यांनी राज्यभरात अंदोलन केलं. आंदोलनात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांचा सहभाग दिसून आला. मात्र, शिवसेनेचा एकही दिग्गज नेता आंदोलनाला उपस्थित असल्याचे दिसले नाही. मंत्री आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह काही नेते उत्तर प्रदेशमध्ये प्रचारासाठी गेले आहेत. तर काही नेते अंगनेवाडी यात्रेत गेले असल्यामुळे आंदोलनाला प्रत्यक्षात शिवसेना नेत्यांना उपस्थित राहात आले नसल्याची शक्यता आहे.
नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी आक्रमक -
इडीची कार्यवाही मागे घ्या, अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन केले जाईल, असे म्हणत हिंगोली राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले. हिंगोली शहरातील गांधी चौकात राष्ट्रवादीच्या वतीने केंद्र सरकर आणि इडीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ गुरुवारी जालना येथे देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केलं. शहरातील गांधी चौकात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी धरणे देत केंद्र सरकारचा तसेच राज्यातील भाजप नेत्यांचा निषेध केला.सदर कारवाई सूडबुद्धीने आणि राजकीय देशातून होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
भाजपचे आंदोलन –
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने अनेक ठिकाणी निदर्शने केली. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. महाविकास आघाडी सरकार,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,शरद पवार आणि नवाब मलिक यांच्याविरोधात घोषणा देत भाजपने निदर्शने केली. पुणे, यवतमाळ, मुंबई, धुळे, नाशिक, नागपूर, बीड, कोल्हापूर आणि परभणीसह इतर अनेक शहरात भाजपकडून आंदोलन करण्यात आले. मंत्री मलिक यांचा राजीनामा घेण्यात आला नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून देण्यात आला.
पुण्यात रस्ता रोको तर सोलापुरात 50 जणांना ताब्यात -
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात पाटस येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले. यावेळी भाजप विरुद्ध घोषणा देखील देण्यात आल्या. सुमारे अर्धा तास झालेल्या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. सोलापुरातही राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं. सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालसमोर राष्ट्रवादीचे आंदोलन झाले. केंद्रातील भाजप सरकार विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकत्यांची निदर्शने करम्यात आली. आंदोलनानंतर जवळपास 50 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नवाब मलिक, दाऊद इब्राहीम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
नागपुरात भाजपच्या वतीने नवाब मालिक यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान अचानक भाजप युवा मोर्च्या कार्यकर्त्यांनी नवाब मलिक आणि दाऊद इब्राहीम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त असताना ही भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी दोन पुतळे जाळले. उपस्थित पोलिसांनी तात्काळ पहिला पुतळा ताब्यात घेत त्यांच्यावर गॅसची फवारणी करत विझवला. मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होताना लगेच दुसरा पुतळा आणून भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी दाऊदचा पुतळा दहन केला. पोलिसांनी याप्रकरणी भाजयुमोच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
मलिक कुटुंबियांचे ईडीवर गंभीर आरोप –
नवाब मलिक यांच्या कुटुंबियांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत, ED च्या रिमांड कॉपीत मलिकांबाबत चुकीची माहिती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मलिकांची मुलगी निलोफर मलिक यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान निलोफर मलिक आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांनी ही माहिती दिलीय. नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर म्हणाल्या, भाजपाकडून मुद्दाम त्रास दिला जातोय. मागील काही दिवस खूप चर्चा होती की ईडीकडून आम्हाला त्रास होणार. आणि शेवटी नवाब मलिक यांना ही ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले आणि तिथे अटक केली. मात्र ईडीच्या रिमांड कॉपीत नवाब मलिकांना यात महसूल मंत्री म्हटले आहे. केंद्रीय यंत्रणेकडून चुकीची आणि खोटी माहिती देण्यात आली असल्याचा आरोप निलोफर यांनी केलाय. निलोफर पुढे म्हणाल्या, आम्ही जमीन खरेदी केली पण त्यात ज्या पद्धतीने चित्र निर्माण केले जे चुकीचे आहे, यावर लवकरच कागदपत्रे दाखवू. अटक करण्यापूर्वी माझ्या कुटुंबियांसोबत पोलिसांनी चर्चा केली नाही. ईडी अधिकारी थेट मलिक यांना घेऊन गेले.
नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा 'ठाकरी बाणा ' मुख्यमंत्री दाखवणार का ?
नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा 'ठाकरी बाणा ' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखवणार का ? असा प्रश्न भाजपकडून विचारण्यात येत आहे. यासाठी भाजपने राज्यभरात आंदोलनं पुकारली आहेत. तर नवाब मालिकांनी भाजपच्या अनेकांची पोलखोल केल्याने त्यांच्या विरोधात सुड उगरण्याचे काम सुरु असल्याची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
मलिकांच्या अटकेनंतर तलवार नाचवणं भाजप नेत्याला पडलं महागात! गुन्हा दाखल
नवाब मलिकांच्या अटकेनंतर काल मोहित कंबोज यांच्याकडून जल्लोष साजरा करण्यात आला. मोहित कंबोज यांच्या घराबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. कंबोज यांनी तलवारही नाचवली. याप्रकरणी कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी तलवार काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. तसंच लोकांची गर्दी जमवत कोरोना (covid) नियमांचं उल्लंघन केल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी तलवार नाचवत आणि फटाके फोडत जल्लोष केला.
नवाब मलिक यांना भेटण्याचा बहीण सईदा खान यांचा प्रयत्न, लिफ्टमध्ये 5 मिनिटं भेट
ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांना भेटण्याचा प्रयत्न त्यांची बहीण सईदा मलिक यांनी केलाय. मलिक यांचा जबाब सुरु असल्यानं ईडीनं आपल्याला भेटू दिलं नाही, पण लिफ्टमध्ये त्यांची पाच मिनिटं भेट झाली असं सईदा खान यांनी एबीपी माझाला सांगितलं. ही राजकीय आणि न्यायालयीन लढाई आहे. ती आपण जिंकू असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केल्याचं सईदा यांनी सांगितलं.
काय आहे नेमकं प्रकरण?
मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. आज मनी लॉंड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.