नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात; राज्यभरातील देवींच्या मंदिरांना रोषणाई, भाविकांची गर्दी
नवरात्रीच्या काळात मंदिरात आदिशक्तीच्या नऊ रूपांची उपासना केली जाते. आज पहिल्या दिवशी ‘शैलपुत्री’ म्हणजे तिच्या मूळ रूपाची पूजा करण्यात आली आहे.
मुंबई : अश्विन शुद्ध प्रतिपदेला म्हणजे आज देशभरात नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात घटस्थापना करण्यात येणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने मुंबईतील मुंबादेवीच्या मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली. पहाटे साडेपाच वाजता देवीची आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात सोडण्यास सुरुवात झाली. या मंदिरात दरवर्षी उत्सवाच्या काळात 8 ते 9 लाख भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. नवरात्रीच्या काळात मंदिरात आदिशक्तीच्या नऊ रुपांची उपासना केली जाते. आज पहिल्या दिवशी ‘शैलपुत्री’ म्हणजे तिच्या मूळ रूपाची पूजा करण्यात आली आहे.
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातही भाविकांची सकाळपासून रीघ लागली आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक याठिकाणी येतात.
नाशिकमधील वणीच्या सप्तश्रृंगी गडावर सकाळी देवीच्या अलंकारांची विधिवत पूजा करण्यात आली. कोहिरी हार, पुतळ्याचं गाठल, मोहन माळ, मंगळसूत्र, वज्रटिप, मुकूट, तोडे, कंबरपट्टा आणि पाऊल असे एकूण 12 किलो सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश यामध्ये होता. पूजेनंतर विश्वस्त कार्यालयापासून गड चढत मंदिरात वाजत गाजत या अलंकाराची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरात 7 वाजता देवीचा अभिषेक करण्यात येऊन महापूजा पार पडली. त्यानंतर घटाची स्थापना करण्यात आली. यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
अमरावती शहराची आराध्यदैवत असणाऱ्या अंबादेवी आणि एकविरा देवीच्या नवरात्रोत्सवालाही आजपासून सुरुवात झाली आहे. नवरात्र उत्सवनिमित्त अंबादेवी आणि एकविरा देवी या दोन्ही मंदिरे रोषणाईने उजळून निघाली आहेत. आज पहाटे अंबादेवी आणि एकविरा देवी या दोन्ही मंदिरात अभिषेक केला गेला. नवरात्री उत्सवादरम्यान दोन्ही मंदिरात देवीच्या दर्शनासाठी पुरुष आणि महिलांची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून तसेच लगतच्या अकोला,नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक अंबादेवी आणि एकवीरा देवीची ओटी भरण्यासाठी अमरावतीत येतात.