कोरोना सावटात पार पडणार तुळजाभवानीचा शारदीय नवरात्रोत्सव; कोरोना सावटामुळं मंदिर भक्तांसाठी बंद
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव 29 सप्टेंबरपासून मंचकी निद्रेने सुरु होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद असणार आहे.
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव 29 सप्टेंबरपासून मंचकी निद्रेने सुरु होणार आहे. यंदा कोरोना संकट असल्यानं मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद असल्यानं भक्तांविना हा सण साजरा करण्यात येणार आहे.
मंचकी निद्रेनंतर 7 ऑक्टोबरला तुळजाभवानी देवीची मूर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापना करून घटस्थापना करण्यात येणार आहे. हा उत्सव 15 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. मात्र कोरोनाचं सावट असल्यानं भक्तांना प्रवेश मिळणार नाही, त्यामुळे भविकांत नाराजीचा सूर आहे. तर उत्सव साधेपणानं साजरा होणार असल्यानं पुजारी आणि व्यापारी यांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे.
मंदिर बंद पण विधी परंपरेनुसार साजरे केले जाणार
मंदिर बंद असले तरी सर्व धार्मिक विधी पूजा परंपरेनुसार साजरे केले जाणार आहेत. 29 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार आयोजित करण्यात आले आहेत.
7 तारखेला घटस्थापना
शारदीय नवरात्र महोत्सवास 29 सप्टेंबर रोजी मंचीकी निद्राने सुरुवात होणार आहे. या काळात देवीची मुर्ती शेजघरात निद्रेसाठी ठेवली जाते. 7 ऑक्टोबर रोजी देवीच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापनाकरून घटस्थापना होणार आहे. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्याच्या सर्व सीमा नवरात्र काळात भाविकांसाठी बंद केल्या होत्या. त्यामुळे देवी दर्शनासाठी भाविक तुळजापुरला येऊ शकले नव्हते.
असे असणार कार्यक्रम
8 ऑक्टोंबर रोजी श्री देवीची नित्योपचार पूजा आणि रात्री छबीना, 9 ऑक्टोंबर रोजी रथअलंकार महापूजा, 10 ऑक्टोंबर रोजी ललित पंचमी असल्याने मुरली अलंकार महापूजा, 11 ऑक्टोंबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, 12 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा, 13 ऑक्टोबरला महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा,14 ऑक्टोंबर रोजी घटोत्थापन आणि 15 रोजी विजयादशमी दसरा असल्यानं पहाटे सिमोल्लंघन हा विधी होणार आहे. त्यांनतर 19 ऑक्टोबर रोजी मंगळवारी कोजागीरी पोर्णिमेनंतर श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीनं अन्नदान अशा प्रकारे शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होईल. तुळजाभवानी देवीच्या नवरात्र उत्सव काळात सर्व विधी तुळजाभवानी मंदिर संस्थान पुजारी मंडळाच्या मदतीनं करणार आहे.