(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तुळजापूरचा नवरात्रोत्सव रद्द करण्याचा मंदिर संस्थानचा निर्णय
Navratri 2020 : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं तुळजापुरातला चैत्री पौर्णिमा यात्रेपाठोपाठ नवरात्र महोत्सवही रद्द करण्यात आला आहे. गेल्या 6 महिन्यापासून तुळजाभवानी मंदिर बंद असल्याने अर्थिक अडचणीत सापडलेल्या शहरवासियांना मंदिर उघडण्याचे वेध लागले होते.
तुळजापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं तुळजापुरातला चैत्री पौर्णिमा यात्रेपाठोपाठ नवरात्र महोत्सवही रद्द करण्यात आला आहे. मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थानच्या बैठकीत हा निर्णय घेतला. यामुळे पुजारी वर्गासोबतच तुळजापूर शहरातील व्यावसायिकांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या 6 महिन्यापासून तुळजाभवानी मंदिर बंद असल्याने अर्थिक अडचणीत सापडलेल्या शहरवासियांना मंदिर उघडण्याचे वेध लागले होते.
जागतिक महामारी कोरोनाचा फटका तुळजाभवानी मातेच्या वर्षातील सर्वात मोठा उत्सव शारदीय नवरात्र महोत्सवाला बसला आहे. गर्दी टाळण्यासाठी नवरात्र महोत्सव कालावधीत भाविकांना शहराबाहेरच अडविण्यात येणार आहे. कोरोनाचा पहिला फटका चैत्र पौर्णिमेला बसला होता. त्यानंतर उन्हाळा सुट्टी, लग्नसराई या कालावधीत मंदिर बंद असल्याने पुजारी, व्यावसायिकांचे आर्थिक नियोजन कोलमडले. सर्वांच्या आशा आगामी नवरात्र महोत्सवावर होत्या. मात्र, नवरात्र महोत्सवही भाविकांशिवाय होणार असल्याचे जाहीर करण्यात आल्याने पुजारी, व्यावसायिकांचे आर्थिक गणित धोक्यात आले आहे.
नवरात्र महोत्सवात तब्बल 15 ते 20 दिवस शहरातील बहुतांश दुकाने 24 तास खुली असते. दिवस रात्र भाविकांची प्रचंड वर्दळ असल्याने सर्वांचा चांगला व्यवसाय होतो. नवरात्र महोत्सवाच्यानंतर दीपावलीच्या सुट्टीतही भाविकांची मोठी गर्दी असते. नवरात्र महोत्सवातील केवळ 15 दिवसांच्या व्यवसायावर दुकानदार, दुकानांचे भाडे तसेच व्यापाऱ्यांची देणी भागवत असतात तर बाकी वर्षभर नफा कमावला जातो. मात्र, नवरात्रच होणार नसल्याने दुकानांचे भाडे, व्यापाऱ्यांची देणी कशी द्यायची? ही चिंता व्यावसायिकांना सतावत आहेत.
नवरात्रात 15 ते 20 लाख भाविक येतात. नवरात्र महोत्सवाच्या 15 दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारच्या आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यासह देशभरातून दररोज लाखो भाविक तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरात येत असतात. यामध्ये ललित पंचमी, नवरात्रातील मंगळवार, शुक्रवार, रविवारी भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. तर अश्विन पोर्णिमेला तर भाविकांची प्रचंड गर्दी असते. या शिवाय घटस्थापनेपूर्वी ज्योत नेण्यासाठीही मोठी गर्दी असते.
17 ऑक्टोबरला घटस्थापना मुहुर्त तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव 9 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. 9 ऑक्टोबर सायंकाळी देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होणार आहे तर 17 ऑक्टोबरला पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना, दुपारी 12 वाजता घटस्थापननेने नवरात्रास प्रारंभ होणार आहे. 25 ऑक्टोबर दुपारी 12 वाजता होमावर धार्मिक विधी, घटोत्थापन तर 26 ऑक्टोबर उषःकाली सीमोल्लंघन सोहळा, त्या नंतर देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ हाेणार असल्याची माहिती आहे.