राणा दाम्पत्याचा आधी खार पोलिसांकडून पर्दाफाश, आता सांताक्रूझ पोलीसही पोलखोल करणार, लवकरच नवा व्हिडीओ जारी
Navneet Rana : खार पोलीस स्टेशनमधील व्हिडीओनंतर आता सांताक्रूझ पोलीसही नवनीत राणांसंबंधीचा व्हिडीओ जारी करणार आहेत.
मुंबई: खार पोलिसांच्या नंतर आता सांताक्रूझ पोलीस हे खासदार नवनीत राणा यांच्यासंबंधीचे सीसीटीव्ही फुटेज जारी करणार असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. आपण मागासवर्गीय असल्याने सांताक्रूझ पोलिसांनी आपल्याला पाणी दिलं नसल्याचं तसेच बाथरुमला जाऊ दिलं नसल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता.
खासदार नवनीत राणांनी केलेले हे आरोप फेटाळत लावत आपण त्यांना सन्मानाची वागणूक दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यावर आता सांताक्रूझ पोलीस स्टेशनमधील व्हिडीओ जारी करण्यात येणार आहे. सांताक्रूझ पोलीस स्टेशनमधील लॉकअपमधील व्हिडीओ असल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई पोलिसांनी त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. त्यामध्ये पोलिसांनी नवनीत राणा यांच्याशी योग्य पद्धतीने व्यवहार केला असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. तसचे नवनीत राणांना ऑफिसर्ससाठी असलेल्या टॉयलेटचा वापर करु दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या सर्व गोष्टी लॉकअपमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचं सांगितलं जातंय.
राणा दाम्पत्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला पाणी देण्यात आलं नाही, तसेच बाथरूमदेखील वापरु दिलं नसल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट करुन खार पोलीस स्टेशनमधला सीसीटीव्ही फूटेज शेअर केलं. या फूटेजमध्ये राणा दाम्पत्य खार पोलीस स्टेशनमध्ये चहा पीत असताना दिसत आहे. सोबतच पाणी देखील त्यांच्यासमोर आहे.
मुंबई पोलिसांच्या या व्हिडीओनंतर आता ही अपमानास्पद वागणूक खार नव्हे तर सांताक्रूझ पोलिसांनी दिली असल्याचा आरोप राणांचे वकील अॅड. रिझवान मर्चंट यांनी केला आहे. नवनीत राणा यांना सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्येही चांगली वागणूक दिल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं असून त्यासंबंधी एक व्हिडीओ जारी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या: