शेतीतील नवदुर्गा : MPSC पूर्वपरीक्षा उत्तीर्ण, आज कोकणात लाखोंची उलाढाल, 'पुणेकर' तरुणीचा भन्नाट प्रवास
रत्नागिरी जिल्ह्यातील रिळ गावात अशी एक महिला शेतकरी आहे जी मुळची पुण्याची अर्थात सर्वार्थाने पुणेकर. दहावी, बारावीच्या परिक्षेत उत्तम मार्क मिळवलेली. राज्यात नाव कमावलेली. एमपीएसची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर देखील लग्नानंतर कोकणात स्थायिक होत शेती करत आदर्श निर्माण करणाऱ्या सुवर्णा वैद्य यांची प्रेरणादायी कहाणी.
रत्नागिरी: दहावी, बारावीच्या परीक्षेत बोर्डात, राज्यात उत्तम गुण मिळवलेला कुणी विद्यार्थी आता शेतीत काम करतोय हे तुम्हाला कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल? शिवाय, प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी अनेक जण वर्षानुवर्षे अभ्यास करतात. पण, एमपीएसची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेली विद्यार्थींनी, ती देखील सर्वांथानं पुणेकर असलेली कोकणातील दुर्गम भागात शेती करतेय, हे ऐकून तुमचा विश्वास बसेल? पण, हे सत्य आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रिळ गावात अशी एक महिला शेतकरी आहे जी मुळची पुण्याची अर्थात सर्वार्थाने पुणेकर. दहावी, बारावीच्या परीक्षेत उत्तम मार्क मिळवलेली. राज्यात नाव कमावलेली. यात कमी म्हणून की काय एमपीएसची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर देखील लग्नानंतर कोकणात स्थायिक होत सध्या त्या शेती करताना दिसत आहे. केवळ शेती करताना नाही तर त्यामध्ये नवेनवे प्रयोग करत लाखोंची उलाढाल करत जवळपास 40 ते 45 लोकांचं पोट भरण्याची किमया सध्या ही महिला शेतकरी करत आहे. सुवर्णा वैद्य पूर्वाश्रमीच्या सुवर्णा गोडबोले असं या प्रगतशिल महिला शेतकऱ्याचं नाव आहे. आता तुम्हाला एक प्रश्न नक्की पडला असेल की या कोकणात शेती का करत आहेत? असं काय घडलं की त्यांना एका शेतकरी मुलाशी लग्न करावं लागलं? नक्कीच हे प्रश्न प्रत्येकाला पडले तर त्यात नवल वाटायला नको. पण, त्यामागची कहाणी देखील एकदम इंटरेस्टींग आहे. शिवाय, इतकी स्टडिअस विद्यार्थींनी शेती का करतेय? कारण, अभ्यासात हुशार किंवा काहीतरी नवीन करण्याची जिद्द असलेला प्रत्येक विद्यार्थी हा शहराकडे धावतो. आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी धडपडतो. कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करत लाखो, करोडो कमावतो. प्रशासकीय अधिकारी होत देखील अनेक जण नाव कमावतात. काहींना तर प्रशासकीय अधिकारी होता देखील होत नाही. असं असताना इतकी हुशार विद्यार्थींनी शेती करतेय?
'ती' कोकण भेट टर्निंग पॉईंट सुवर्णा या मुळच्या पुण्याच्या. जंगली महाराज रोडवर त्यांचं घर. सुट्टीनिमित्त सुवर्णा या आपल्या मैत्रिणीच्या कोकणातील रिळ या मुळगावी आल्या. गाव तसं दुर्गमच. कोकणातील एखाद्या गावाला शोभेल असंच इथलं वातावरण. त्याचवेळी त्यांच्या मैत्रिणीनं त्यांची ओळख मिलिंद वैद्य या होतकरू शेतकरी मुलाशी करून दिली. त्यावेळी मिलिंद यांच्या घरची परिस्थिती देखील बेताची होती. रोज 10 किमी पायपीट करत त्यांनी आपली दहावी पूर्ण केली होती. शिवाय, शेतीत नवनवे प्रयोग करण्याकडे त्यांचा कल होता. ही सारी कथा ऐकून सुवर्णा देखील थक्का झाल्या. हा एक नवीन अनुभव घेऊन त्या पुण्यात परतल्या होत्या. पण, त्यांच्या घरच्यांना आणि त्यांना देखील मिलिंद वैद्य यांची सारी कहाणी अद्याप देखील डोक्यात घोळत होती. पुण्यासारख्या सुखवस्तू शहरात राहत असलेल्या सुखसोयी आणि कोकणातील ग्रामीण भागातील स्थिती. याबद्दल डोक्यात विचार सुरूच होता. या साऱ्या परिस्थितीसमोर सारं काही गौण होतं. दिवसामागून दिवस जात होते. अखेर सुवर्णा यांना लग्नाकरता मिलिंद यांचं स्थळ सुचवलं गेलं. घरचे तसेच सुवर्णा या देखील या लग्नाकरता तयार नव्हत्या. पण, हळूहळू मात्र स्थिती बदलली. मिलिंद हे होतकरू आणि प्रामाणिक असल्यानं एका भेटीनंतर लग्न करण्याचा निर्णय झाला. सारासार विचार करत सुवर्णा यांनी या लग्नाला होकार दिला होता. ''मिलिंद प्रमाणिक होता. कष्ट करण्याची जिद्द होती. शेतीत देखील नवीन काहीतरी करता येईल याचबद्दल आत्मविश्वास होता. शिवाय, त्यांच्याबद्दल ऐकल्यानंतर शहरात राहून काही असलेल्या काही गोष्टींबद्दल आता आपलेपणा असा नव्हता. ग्रामीण भागात अशी देखील माणसं आज वावरतात, राहतात. यावर विश्वास बसत नव्हता. या साऱ्या परिस्थितीचा सारासार विचार करून मी लग्नाला तयार झाल्याचं'' सुवर्णा यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. महत्वाचं म्हणजे मिलिंद वैद्य यांनी देखील आपलं एमएपर्यंतचं शिक्षण पूर्ण केले असून अनेक ठिकाणी ते लेक्चरर म्हणून देखील भेटी देतात. काहीजण तर त्यांना शेतीतील विद्यापीठ म्हणून देखील आसपासच्या परिसरात ओळखतात. हे विशेष! ''सुरूवातीचे सहा महिने कठीण'' लग्नानंतर सुरूवातीचे सहा महिने कठिण होते. कारण गावात पुरेशा सुविधा नव्हत्या. विजेपासून अनेक गोष्टींची वाणवा होती. गाव दुर्गम होता. पलिकडे जाण्याकरता असणारा साकव देखील ससत हलत असायचा. घरापर्यंत येण्याकरता रस्ता देखील नव्हता. या आणि अनेक कारणांनी पहिले सहा महिने कठिण गेले. पण, त्यानंतर मात्र इथली सवय झाली आणि मन रमू लागलं, असं सुवर्णा सांगतात. सुवर्णा यांची सुवर्ण शैक्षणिक कामगिरी दहावीत काही मार्कांनी बोर्डात येण्याची संधी हुकली. त्यामुळे बारावीला उत्तम अभ्यास केला, राज्यशास्त्र या विषयात बोर्डात आणि राज्यात येण्यानं दहावीची कमी भरून निघाली. त्यानंतर तत्वज्ञान या विषयात डॉक्टरेट करण्याची इच्छा मनात ठेवत अभ्यास सुरू केला. दरम्यानच्या काळात अविनाश धर्माधिकारी सर यांच्या प्रभावानं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. एमपीएससीची पू्र्वपरिक्षा उत्तीर्ण झाले देखील. शिवाय, यूपीएससची देखील तयारी सुरू होती. पण, कोकणात आले आणि सारी स्थिती बदलली. अशी प्रतिक्रिया सुवर्णा वैद्य यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली. पश्चाताप नाही होत? सुवर्णा वैद्य यांची सारी कहाणी ऐकल्यानंतर हे सारं सोडून कोकणात येणे. लग्न करणे आणि ते देखील एका शेतकरी मुलाशी या निर्णयाचा केव्हा पश्चाताप नाही होत का? असा सवाल त्यांना 'एबीपी माझा'नं केला. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, अजिबात नाही. उलट निर्णय योग्य असल्याचं सुवर्णा सांगतात. कारण, इथं येवून शेतात राबणे आणि त्या कष्टातून हे सारं उभं करणे यात एक वेगळं समाधान असल्याचं सुवर्णा सांगतात. या ठिकाणी आल्यानंतर अनेक गोष्टी शिकता आल्या. इतर शेतकरी देखील बरंच काही शिकवून जातात. अशी प्रतिक्रिया देखील यावेळी सुवर्णा देतात. 'शेतीत खूप काही करण्यासारखं' 'शेतीत खूप काही करण्यासारखं आहे. यातील प्रयोग संपूच शकत नाहीत. सर्वच प्रयोग यशस्वी होतील असं नाही. पण, त्यातून देखील बरंच काही शिकता येतं. एखाद्या नोकरीमध्ये तुम्हाला जे समाधान मिळत नाही ते शेतीत मिळतं. नोकरी करताना तुम्हाला मिळणारं पॅकेज किंवा पगाराची तुलना करता ती रक्कम किंबहुना त्यापेक्षा देखील जास्त पैसे तुम्हाला शेतीतून मिळतात. पण, हे सारं करत असताना एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे तुम्ही दुसऱ्याच्या भरवशावर शेती करू शकत नाही. कोकणातील नोकरी-धंद्यासाठी मुंबईत जाणाऱ्या तरूण-तरूणींना याचा गांभीर्यानं विचार करायला काहीच हरकत नाही. गावात पडून असलेल्या जमिनीमध्ये खूप काही पिकवता येतं. त्याकरता मार्केट देखील तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातच उपलब्ध आहे. योग्य नियोजन आणि वातावरणाचा पोत याचा अभ्यास केल्यास शेतीतील प्रयोग किंवा विविध पिकं यशस्वी होऊ शकतात. आम्ही त्याचा अनुभव घेतोय. कोकणातील लाल मातीत गहू, सोयाबीन, बटाटा, मका, कांदा ही देखील पिकं घेतली जातील. आम्ही गहू पिकवण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. आम्ही बारमाही शेती करतो. भाजीपाला, विविध कडधान्य आम्ही केवळ जिल्ह्याच्या नाही तर मुंबई, पुण्याला देखील पाठवतो. ऑर्गेनिक म्हणून याला खूप मागणी आहे. अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर शेतातील गवतापासून आम्ही खतं तयार करून त्याचाच वापर पिकांना करतो. यावरून शेती म्हणजे काय? हे लक्षात येते.' या साऱ्याबद्दल बोलताना सुवर्णा आपले पती मिलिंद वैद्य यांच्याबद्दल आवर्जून आणि भरभरून बोलतात. 45 कुटुंबांना रोजगार आणि लाखोंची उलाढाल मिलिंद आणि सुवर्णा यांच्या संसाराला जवळपास 15 ते 16 वर्षे झाली आहेत. त्यांना एक मुलगा असून तो सध्या नववीमध्ये आहे. या काळात त्यांनी शेतीत अनेक प्रयोग केले. शेतीतील अनेक कामं सुवर्णा सराइतपणे करतात. म्हणजे त्यांना काम करताना पाहिल्यानंतर या पुण्यातील आहे का? असा प्रश्न पडतो. हूळूहळू त्यांनी आपल्या शेतीचं क्षेत्र देखील वाढवले. आज काही एकर जमिनीमध्ये वैद्य दाम्पत्य शेती करतं. यातून वर्षाकाठी लाखोंची उलाढाल होते. महत्त्वाचं म्हणजे जवळपास 40 ते 45 कुटुंबं यावरती अवलंबून असून त्यांना दर महिना चांगला मोबदला दिला जातो. काहीजण तर या ठिकाणी महिना पगारावर काम करतात. महत्त्वाचं म्हणजे या साऱ्यांना आता काय करायचं आहे? हे सांगण्याची गरज नाही. सर्वजण मजूर म्हणून नाही तर आपली स्वत:ची शेती आहे असंच काम करतात. आम्ही जीवनावश्यक अशी प्रत्येक वस्तु पिकवतो आणि त्याचं वितरण देखील करतो. पहाटे लवकरच दिनक्रम चालून झाल्यानंतर वितरण व्यवस्था पाहणे देखील महत्त्वाचं आहे,अशी माहिती यावेळी सुवर्णा यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली. या चिमण्यांनो परत फिरा! कोकणातील माती सुपीक आहे. आज हजारो हेक्टर जमीन पडून आहे. समस्या नक्कीच आहेत. पण, आव्हानं कुठं नाहीत? सध्या कोकणातील मोठा वर्ग शहरात कामानिमित्त आहे. त्याला बरीच कारणं देखील आहेत. पण, योग्य व्यवस्थापन, अभ्यास केल्यास शेतीत फायद्यात आहे. कोकणातील देखील त्यातून मोठी उलाढाल करता येऊ शकते, सध्या अनेक जण अशा प्रकारचे प्रयोग करत आहेत. त्यामुळे सारी परिस्थिती पाहता आणि कोकणातील तरूण - तरूणींनी देखील शेतीत लक्ष घातल्यास भविष्य नक्कीच उज्ज्वल होऊ शकतं असा आशावाद देखील सुवर्णा व्यक्त करतात.