Nashik Bus Accident : नाशिक बस दुर्घटनेप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, ट्रकचालकास अटक
Nashik Bus Fire : नाशिक शहरात शनिवारी भीषण अपघात झाला. या अपघात प्रकरणी आडगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ट्रक चालकाला शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.
Nashik Bus Fire : नाशिक शहरातील औरंगाबाद (Nashik Bus Accident) रोडवरील मिरची हॉटेलजवळ शनिवारी भीषण अपघात झाला. या अपघातात लक्झरी बसने पेट घेतल्यात त्यामध्ये होरपळून 12 जणांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी आडगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ट्रक चालकाला शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.
नाशिककरांसाठी शनिवार ठरला काळा दिवस
शनिवारचा दिवस नाशिककरांसाठी काळा दिवस ठरला. शनिवारची सकाळ नाशिककरांना सुन्न करणारी होती. नाशिकमधील मिरची हॉटेल चौफुलीवर ट्रक आणि चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसचा पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. ट्रक आणि बसची टक्कर झाल्याने बसने पेट घेतला आणि ही दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने बसचा कोळसा झाला. मात्र या घटनेत 12 निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे.
ट्रक आणि बसची टक्कर झाल्याने बसने घेतला पेट
दरम्यान, अपघात एवढा भीषण होता की, बस पूर्णतः जळून खाक झाली. ट्रकच्या डिझेलच्या टँकला धडक दिल्याने डिझेल रस्त्यावर सांडले. यवतमाळहून मुंबईकडे निघालेली बस नाशिकमध्ये पोहोचली. त्यामुळे इंजिन गरम असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातूनच बसने पेट घेतला असावा असा अंदाज वाहतूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय पहाटेची वेळ, रस्ता सुमसान असल्याने दोन्ही वाहने वेगात असतील. यावरूनच अपघाताची दाहकता लक्षात येते.
अपघात प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान या दुर्घटनेप्रकरणी ट्रकचालक रामजी यादव आणि दीपक शेंड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे. आडगाव पोलिसांनी रात्री उशिराही कारवाई केली आहे. रामजी यादव (उत्तर प्रदेश) असे ट्रक चालकाचे नाव आहे.
'अपघाताला ट्रॅव्हल्स कंपनीसोबतच प्रशासनही जबाबदार'
बसच्या भीषण अग्नितांडवात आपल्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्याचं समजताच विदर्भातील अनेक भागातून रात्री उशिरा मृतांचे नातेवाईक नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल होताच परिसरात त्यांचा आक्रोश बघायला मिळाला. वाशीम जिल्ह्यातील परोडी गावचे भिलंग कुटुंबातील उद्धव भिलंग आणि वैभव भिलंग हे काका आणि पुतणे एका गाडीच्या व्यवहारासाठी नाशिकला चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसने येत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. दरम्यान या घटनेला ट्रॅव्हल्स कंपनी सोबतच प्रशासनही जबाबदार आहे, खासगी ट्रॅव्हल्सकडून सर्व नियम पायदळी तुडवले जात असताना प्रशासनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतं, असा आरोप उद्धव भिलंग यांच्या मित्रमंडळींनी करत कारवाईची मागणी केलीय.