लॉकडाऊनमुळे नोकरी गेलेल्या तरुणाने स्वत:चा उद्योग सुरु केला, इतरांनाही रोजगार दिला!
लॉकडाऊनमुळे नोकरी गेली म्हणून खचून न जाता येवल्यातील तरुणाने गावातच स्वत:चा एलईडी बल्ब बनवण्याचा छोटा उद्योग सुरु केला. एवढंच नाही तर या उद्योगातून त्याने काही मित्रांनाही रोजगार उपलब्ध करुन दिला.
नाशिक : कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरु झाले आणि अनेक कंपन्या बंद पडल्या, अनेक कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली तर अनेकांना कंपनी मालकांनी पैसे देण्यास असर्थता दाखवली. अशा परिस्थितीत नाशिकमधील कंपनीतून नोकरी सोडून घरी आलेल्या येवला तालुक्यातील धामणगाव इथल्या महेश शिवाजी गवळी या तरुणाने खचून न जाता स्वत:चा एलईडी बल्ब बनवण्याचा छोटा उद्योग सुरु केला. शिवाय गावातील चार मित्रांना त्याच्या उद्योगात सामील करत त्यांनाही रोजगार उपलब्ध करुन दिला.
कोरोनाच्या महामारीत कंपनी मालकांनी आपल्या कामगारांना घरी जाण्यास सांगितलं. कारण कंपन्या बंद पडल्याने कामगारांना सांभाळणे, त्यांना पगार देणं कंपनी मालकांना जिकरीचे बनलं होतं. महेश सुद्धा अशाच एका कंपनीत नाशिक इथे नोकरी करत होता. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर कंपनी बंद ठेवण्यात आली, शिवाय पैसे देण्यासही असमर्थता दर्शवल्यानंतर महेश आपल्या गावी धामणगाव इथे आला.
काही तरी करायचे या विचारात असताना पूर्वी शिकलेल्या इलेक्ट्रिक वायरिंगचा अनुभव पाहता त्याने आपल्याकडे जमा असलेल्या पैशातून एलईडी बल्ब बनवण्याचा छोटा उद्योग आपल्या घरातच सुरु केला. कच्चे मटेरिअल विकत आणून त्याने आपल्या कामाला सुरुवात केली. तयार केलेले बल्ब विकण्यासाठी त्याने आपल्या मित्रांसह ग्रामीण भागात मार्केटिंग सुरु केलं. अल्प दरात चांगले आणि वॉरंटी असलेले बल्ब होलसेल भावात मिळत असल्याने ग्रामीण भागात त्याला चांगली मागणी येऊ लागली. त्यामुळे रोज 200 पेक्षा जास्त बल्ब तो तयार करु लागला. हे करत असताना त्याने आपल्या या छोट्या उद्योगातून गावातील मित्रांना पण रोजगार उपलब्ध करुन दिला.
कुठला उद्योग सुरु करण्यापेक्षा तो सीजनेबल असेल किंवा अल्प काळासाठी असेल असे न ठरवता तो कायमस्वरुपी असावा, अशी कल्पना मनात ठेवून कायम स्वरुपी आणि सर्वांना सतत गरज असलेल्या एलईडी बल्ब बनवण्याचा उद्योग आपण सुरु केल्याच महेश सांगतो.
सध्याच्या परिस्थितीला ग्रामीण भागातून महेशने बनवलेल्या बल्बला चांगली मागणी असल्याने तो सुद्धा आनंदात आहे. असाच प्रतिसाद मिळाल्यास यापुढे आणखी मोठे युनिट टाकण्याचा मानस असल्याचं महेश गवळीने बोलून दाखवलं.
एकूणच लॉकडाऊनमुळे कोणाचे रोजगार गेले तर कोणी आत्मर्निभर होत स्वत:चा उद्योग सुरु केला. महेशसारख्या ग्रामीण भागातील तरुणाने केलेले हे धाडस नक्कीच कौतुकास पात्र ठरलं आहे.