कोरोना रुग्णांवर दाताचे अन् कानाचे डॉक्टर उपचार करतायंत, आरोग्य यंत्रणेची ही अवस्था; नारायण राणेंचा राज्य सरकारवर प्रहार
सिंधुदुर्गातील सरकारी रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर डेन्टिस्ट आणि ईएनटी डॉक्टर उपचार करतायंत ही राज्याची आरोग्य यंत्रणा असल्याची टीका केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केली.
मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय नाहीत, मग औषधांचं तर सोडाच. सिंधुदुर्गात कोरोनाच्या रुग्णांवर दातांच्या आणि कानाच्या डॉक्टरांकडून उपचार करुन घेत आहेत, ही राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणेची अवस्था असल्याची जोरदार टीका केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केली आहे.
नारायण राणे म्हणाले की, "सिंधुदुर्गात एका सरकारी रुग्णालयात कोरोनाचे 110 रुग्ण उपचार घेत होते. त्या ठिकाणी मी गेलो असता डॉक्टर कोण आहेत हे पाहूया अशी विचारणा केली. त्यावर एक कानावर उपचार करणारा डॉक्टर तर दुसरा दातांवर उपचार करणारा डॉक्टर समोर आला. हे दोन्ही डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करत होते. आरोग्य यंत्रणेची अशी अवस्था असेल तर रुग्ण मरणार नाहीत तर काय होणार?
सिंधुदुर्गातील सरकारी रुग्णालयातील ही अवस्था आहे, हीच अवस्था राज्यभर असून औषधांमध्ये महाविकास आघाडीने पैसे खाल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला आहे.
मी कुणासमोर विनम्र व्हावं हा माझा प्रश्न आहे, गोमुत्र कुठं शिंपडायचं हा त्यांचा प्रश्न आहे. औषधांत पैसे खाणारे सरकार गोमुत्र हातात घ्यायच्याही पात्रतेचं नाही, आधी शिवसेनेनं स्वत:च मन शुध्द करावं आणि मग बाळासाहेबांच्या स्मारकाचे शुद्धीकरण करावं अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली.
नारायण राणेंनी मुंबईतून गुरुवार पासून आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. त्यांनी मोदी सरकारच्या मागील सात वर्षाच्या कामाचा लेखाजोगा मांडण्याचा प्रयत्न केला.
जन आशीर्वाद यात्रा ही मोदींची संकल्पना असून केंद्रातील मंत्र्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांच्या अडचणी समजवून घेण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा सुरु केली आहे असं नारायण राणेंनी सांगितलं.
नारायण राणे म्हणाले, "गेल्या सात वर्षात पंतप्रधानांनी देशातल्या जनतेसाठी काम केलं, देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी काम केलं. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानंतर देश महासत्तेकडे वाटचाल करण्यासाठी पंतप्रधान प्रयत्न करत आहेत."
देशात एकही बालक कुपोषित राहू नये यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देतात, त्यांचा अभिमान वाटतोय असंही नारायण राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- औषधांत पैसे खाणारे सरकार गोमुत्र हातात घ्यायच्याही पात्रतेचं नाही, आधी स्वत:च मन शुध्द करावं: नारायण राणे
- Coronavirus Today : देशात गेल्या 24 तासांत 36 हजार 571 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 540 रुग्णांचा मृत्यू
- Rajiv Gandhi : माजी पंतप्रधान राजीव गांधींचे 'ते' सहा निर्णय; देशाच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी ठरले महत्त्वाचे