औषधांत पैसे खाणारे सरकार गोमुत्र हातात घ्यायच्याही पात्रतेचं नाही, आधी स्वत:च मन शुध्द करावं: नारायण राणे
मुंबईतील 32 वर्षांचा बकालपणा घालवायचा असेल तर सत्तांतर आवश्यक असल्याचं नारायण राणे म्हणाले. राज्य सरकारने आपल्या डोक्यावर दिल्लीत कोणीतरी बसलंय हे लक्षात ठेवावं असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबई : मी कुणासमोर विनम्र व्हावं हा माझा प्रश्न आहे, गोमुत्र कुठं शिंपडायचं हा त्यांचा प्रश्न आहे. औषधांत पैसे खाणारे सरकार गोमुत्र हातात घ्यायच्याही पात्रतेचं नाही, आधी शिवसेनेनं स्वत:च मन शुध्द करावं आणि मग बाळासाहेबांच्या स्मारकाचे शुद्धीकरण करावं अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, "स्मारकाचा अभिमान असेल तर दलदलीमधील असणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मारकाचं आधी सुशोभीकरण करावं. जे गोमुत्र शिंपडायला आलेले ना त्यांनी ते स्मारक जागतिक दर्जाचं कसं होईल याकडे पहावं. त्यांनी आधी स्वत:चं मन शुद्धीकरण करावं, मग स्मारकाचं शुद्धीकरण करावं."
गोमुत्र का शिंपडलं ते ते शिंपडणाऱ्यांना विचारा असंही नारायण राणे म्हणाले. राज्यात सुडबुध्दीने वागणाऱ्या सरकारने, खोटे गुन्हे नोंद करणाऱ्या सरकारने त्यांच्या डोक्यावर दिल्लीत कोणीतरी बसलंय हे लक्षात ठेवावं असा इशाराही नारायण राणेंनी दिला.
मुंबईचा बकालपणा घालवायचा असेल तर सत्तांतर आवश्यक
नारायण राणे म्हणाले की, "मुंबईत गेली अनेक वर्षे एकाच पक्षाची सत्ता आहे, त्यांनी मुंबई बकाल केली. मुंबईतला 32 वर्षांचा बकालपणा संपवण्यासाठी सत्ता परिवर्तन होणं गरजेचं आहे, भाजपची सत्ता येणं आवश्यक आहे. मुंबईत भाजपची सत्ता येणार आणि त्याला आम्ही जागतिक दर्जाचे शहर करणार."
आता हिंदुत्वाच्या मुद्द्याचा त्याग करुन शिवसेनेने लाचारी पत्करली आहे. त्यामुळेच आज शिवसेना ही सोनिया गांधींनी बोलावलेल्या बैठकीला हजर राहत असल्याचं नारायण राणे म्हणाले. शिवसैनिकांचं खरं रुप काय आहे हे वेळ आल्यावर सांगणार, ती वेळ त्यांनी येऊ नये असंही नारायण राणे म्हणाले.
जन आशीर्वाद यात्रा ही मोदींची संकल्पना असून केंद्रातील मंत्र्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांच्या अडचणी समजवून घेण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा सुरु केली आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिली.
नारायण राणेंनी मुंबईतून गुरुवार पासून आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. त्यांनी मोदी सरकारच्या मागील सात वर्षाच्या कामाचा लेखाजोगा मांडण्याचा प्रयत्न केला.
नारायण राणे म्हणाले, "गेल्या सात वर्षात पंतप्रधानांनी देशातल्या जनतेसाठी काम केलं, देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी काम केलं. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानंतर देश महासत्तेकडे वाटचाल करण्यासाठी पंतप्रधान प्रयत्न करत आहेत."
देशात एकही बालक कुपोषित राहू नये यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देतात, त्यांचा अभिमान वाटतोय असंही नारायण राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- कोरोनाच्या रुग्णांवर दातांचे आणि कानाचे डॉक्टर उपचार करतायंत,आरोग्य यंत्रणेची ही अवस्था; नारायण राणेंचा राज्य सरकारवर प्रहार
- Coronavirus Today : देशात गेल्या 24 तासांत 36 हजार 571 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 540 रुग्णांचा मृत्यू
- Rajiv Gandhi : माजी पंतप्रधान राजीव गांधींचे 'ते' सहा निर्णय; देशाच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी ठरले महत्त्वाचे