नांदेडमधील भोकर ऑनर किलिंग प्रकरण, मुख्य आरोपीला दुहेरी फाशी तर एकाला जन्मठेप
पूजा वर्षेवार आणि तिचा प्रियकर गोविंद कराळेची हत्या तिच्याच भावाने केली होती. ही हत्या करणाऱ्या दिगंबर दासरेला फाशी सुनावण्यात आली आहे. तर त्याला साथ देणारा त्याचा चुलत भाऊ मनोज दासरेला जन्मठेप सुनावण्यात आली आहे.
नांदेड : भोकर येथील ऑनर किलिंग प्रकरणी मुख्य आरोपीला दुहेरी फाशी तर अन्य एकाला जन्मठेपेची शिक्षा भोकर न्यायालयाने सुनावली आहे. 23 जुलै 2017 रोजी या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला होता. विवाहित बहीण प्रियकरासोबत पळून गेल्याने मुलीच्या सख्या आणि चुलत भावाने तिची हत्या केली होती.
पुजा वर्षेवार आणि तिचा प्रियकर गोविंद कराळे या दोघांची हत्या झाली होती. मुख्य आरोपी पुजाचा भाऊ दिगंबर दासरे याला दुहेरी फाशी तर चुलत भाऊ मोहन दासरे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
पुजाचं लग्न भोकर येथील जेटीबा हसेन्ना वर्षेवार याच्यासोबत झालं होतं. मात्र लग्नापूर्वी साधारण तीन वर्षंपासून पुजाचं गावातील गोविंद कराळे याच्याशी प्रेम संबंध होते. पुजा आपल्या सासरहून 22 जुलै 2017 रोजी पहाटे कुणालाही न सांगता पळून गेली होती. याबाबत मयत पुजाच्या पतीने भोकर पोलिसात ती बेपत्ता असल्याती तक्रार दाखल केली होती.
दरम्यान पुजाच्या भाऊ दिगंबरला बहिणीच्या लग्नाआधीच्या प्रेमसंबंधाची माहिती होती. गोविंदशी ओळख असल्यामुळे दिगंबरने त्याला फोन करुन ते कुठे आहेत याची माहिती घेतली. आपली बहीण व तिचा प्रियकर तेलंगणातील खरबाळा येथे गोविंदच्या बहिणीकडे असल्याचे समजले.
त्यानंतर भाऊ दिगंबर दासरे आणि चुलत भाऊ मोहन दासरे यांनी तेथे जावून त्यांची भेट घेतली. दोघांना समजून सांगून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांना भोकरच्या दिशेनं आणलं. मात्र वाटेतच दोघांनी अगोदर गोविंद आणि नंतर पुजाची कोयत्याने गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर आरोपींनी भोकर पोलीस ठाण्यात जाऊन स्वत: गुन्ह्याची कबुली दिली होती.