(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने देशाची स्मशानभूमी केली, नाना पटोले यांची टीका
कोरोन काळात केंद्र सरकारचा ढिसाळपण, नियोजन शून्यता आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या नियमांचे पालन न केल्याने देशाची स्मशानभूमी बनली, असल्याची टीका नाना पटोले यांनी केली.
रायगड : देशात कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. तर कोरोनाशी सामना करण्यासाठी यंत्रणा देखील अपरी पडत आहे. अशात सत्ताधारी विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अहंकारात अडकलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने देशाची स्मशानभूमी केली, असल्याची टोकाची टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. आज ते रायगड जिल्ह्यातील वादळग्रस्त गावांच्या पाहणी दौऱ्यावर आले होते.
देशात वाढणाऱ्या कोरोना परिस्थिती संदर्भात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तातडीने उपाययोजना करण्याची सूचना केली होती. परंतु भाजप आणि केंद्र सरकारमार्फत अहंकारी वृत्तीने थट्टा करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात डब्ल्यूएचओने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची कल्पना केंद्र सरकारला दिली होती. तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारने आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून देश कोरोना मुक्त झाला असल्याची माहिती दिली होती. त्याच महिन्यात देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच वाढ झाली होती. यावेळी केंद्र सरकारचा ढिसाळपण, नियोजन शून्यता आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या नियमांचे पालन न केल्याने देशाची स्मशानभूमी बनली, असल्याची टीका नाना पटोले यांनी केली.
सध्याची ही वेळ फक्त राजकारणाची नसून देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्याची असून काँग्रेसची थट्टा करण्याचे काम हे भाजप आणि मोदी सरकारकडून करण्यात येत असल्याची खंत नाना पटोले यांनी व्यक्त केली. भाजप आणि केंद्राच्या या अहंकारी वृत्तीमुळे नागरिकांचे प्राण जात असून देशातील मृतांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असल्याची टीका पटोले यांनी केली.
आशिष शेलार याच्या टिकेला प्रत्युत्तर
दरम्यान आशिष शेलार यांनी नाना पटोले यांच्यावर केलेल्या टिकेला प्रतिउत्तर देताना आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नसून विदूषक कोण हे पश्चिम बंगाल आणि देशाने दाखवून दिलं आहे. तर, आशिष शेलार हे विदूषक कंपनीतील छोटे कार्यकर्ते असून नैसर्गिक आपत्तीच्या या काळात खालच्या पातळीच्या टीका करत असतील तर ते लोकांना मदत करण्यापेक्षा दिशाभूल करण्याचे काम करत असल्याची खंत व्यक्त केली आहे. या देशात कोण हिरो आणि कोण विदूषक आहे हे जनता ठरवेल असे म्हणत आशिष शेलार यांच्यावर पलटवार केला आहे.