Pune Bypoll election : पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? नाना पटोलेंना मुख्यमंत्र्यांचा फोन आला पण...
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कसबा, चिंचवचड मतदार संघाची पोटनिवडणूक लढवणार आहे, अशी ठाम भूमिका घेतली आहे.
Pune bypoll election : एकीकडे भाजपकडून कसबा-चिंचवड (Kasba Bypoll Election) (Chinchwad Bypoll Election) पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत तर दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कसबा, चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक मविआ लढवणार आहे, अशी ठाम भूमिका घेतली आहे. भाजपच्या सर्व नेत्यांकडून बिनविरोध करण्यासाठी तयारी सुरु आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील सर्वपक्षीय नेत्यांशी फोनवरुन चर्चा केली आहे आणि त्यांच्याकडे बिनविरोध निवडणूक करण्याची मागणी केली आहे.
नाना पटोले म्हणाले की, मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी परंपरा सांगितली. जर एखाद्या आमदाराचे निधन झाले तर आपण ती जागा आपण बिनविरोध निवडून देतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कसबा मतदारसंघातून भाजपने टिळक कुटुंबाला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे आम्ही कसब्याची तयारी करत आहोत. कसब्यातून काँग्रेसचा उमेदवार असणार आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून या निवडणुकीत लक्ष देत आहे. ही निवडणूक आम्हाला जिंकायची असल्याचं ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्यावर त्यांच्याकडे सरकारविषयी तक्रार केली. सरकार म्हणून तुम्ही बरोबर वागत नसून सत्तेत आल्यापासून तुम्ही आमची कामे थांबवली आहेत. यापूर्वी अशी कामे थांबवली गेली नव्हती, अशी तक्रारदेखील केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
दोन्ही मतदार संघाच्या उमेदवारांची नावं लवकरच निश्चित होणार आहे. त्यात कसब्यासाठी कॉंग्रेसच्या उमेदवाराचं नाव निश्चित होणार आहे. या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली आहे. मात्र विरोधीपक्षनेते अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित केला जाईल, असं ते म्हणाले.
चिंचवडची जागा राष्ट्रवादी लढणार
लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यांच्या जागेसाठी महाविकास आघाडीतील इच्छूक उमेदवारांची मोठी यादी आहे. त्यात राहुल कलाटे याच्या नावाची चर्चा आहे. त्यावर नाना पटोले म्हणाले की चिंचवडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढत आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही राष्ट्रवादीसोबत आहोत. कसब्याबाबत प्रस्ताव देण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. पण भाजपने टिळक कुटुंबियांना उमेदवारी न दिल्याने आता तो प्रश्नच राहिला नाही,असं देखील ते म्हणाले,
भाजपकडून सर्वपक्षीयांना आवाहन
भाजपकडून कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. यात मनसेनेदेखील भाजपला पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यासोबत शिंदेगटही भाजपसोबत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता निवडणूक बिनविरोध होणार की काटे की टक्कर होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.