LOC वरुन बेपत्ता झालेल्या नागपूरच्या महिलेचा शोध लागला, पाकीस्तानच्या प्रशासनानं भारतीय BSF ला सोपवलं
एलओसीवरुन बेपत्ता झालेल्या नागपूरच्या महिलेचा शोध लागला आहे. महिलेला पाकीस्तान प्रशासनाकडून भारतीय बीएसएफला सोपवलं गेलं आहे.

Nagpur : एलओसीवरुन बेपत्ता झालेल्या नागपूरच्या महिलेचा शोध लागला आहे. महिलेला पाकीस्तान प्रशासनाकडून भारतीय बीएसएफला सोपवलं गेलं आहे. सुनीता असं या महिलेचं नाव आहे. प्राथमिक चौकशीमध्ये तिने सोशल मीडियाच्या अकाउंटवरुन पाकिस्तानच्या व्यक्तीशी चॅटिंग केल्याचं समोर आलं आहे. नेमकी चॅटिंग काय होती, त्यात आक्षेपार्ह आहे की नाही? या संदर्भातही पुढील तपास केला जाणार आहे.
सुनीता ही नागपुरातून 4 मे रोजी कश्मीरला फिरायला जात आहे असं सांगून घरुन 18 प्रकार शिकणाऱ्या मुलाला घेऊन निघाली होती. त्यानंतर 11 मे रोजी कारगिल पोलिसांकडून माहिती मिळाली होती की मुलीला एलओसी जवळच्या अखेरच्या गावात सोडून ती पाकिस्तानला गेली होती. अमृतसरमध्ये बीएसएफला पाकिस्तानी प्रशासनाने तिला सोपवले आहे. महिलेला ताब्यात घेतल्यानंतर प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर नागपूर पोलिसांना माहिती देण्यात आली.
कपिल नगर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच एक अधिकारी आणि दोन महिला पोलीस कर्मचारी हे अमृतसरला गेले आहेत. अमृतसरला पोहचून कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर सुनीता जामगडेला ताब्यात घेतील. पुढील चौकशी नागपूर पोलीस करतील अशी माहिती पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली आहे. कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनीता सुरुवातीला नर्स म्हणून काम करत होती. त्यानंतर ती कपडे शिवण्याचं काम करायची. तिची मानसिक स्थिती अस्थिर असून तिच्या नागपूरतील रुग्णालयात उपचार सुद्धा सुरु होते.
























