Nagpur : तपास यंत्रणांनी हत्या प्रकरण गांभीर्याने घेतले नाही, डॉ. हमीद दाभोळकर यांची टीका
चारही खून घडवण्यामागे चार ते पाच संघटनांचा आंतरराज्य गट कारणीभूत असून त्यांचे फ्रंट लाईन ऑपरेटर्स तुरुंगात आहेत मात्र मास्टरमाइंड पकडले गेलेले नाही हे गंभीर असल्याचे मुक्ता दाभोलकर म्हणाल्या.
नागपूर : डॉ. नरेंद्र दाभोळकर (Narendra Dabholkar) यांच्या हत्येनंतर झालेल्या तपासाबाबत आज हमीद दाभोळकर आणि मुक्त दाभोळकर यांनी खंत व्यक्त केलीय. तपास यंत्रणांनी हत्या प्रकरण गांभीर्याने न घेतल्यामुळे पुढे गोविंद पानसरे, एम एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचीही हत्या झाली अशी खंत व्यक्त केलीय. नागपुरातील कार्यक्रमात डॉ. हमीद दाभोळकर आणि मुक्ता दाभोळकर बोलत होते.
डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर आम्ही आमच्या पहिल्याच जबाबात संघटित प्रयत्नांनी केलेला खून आहे हे तपास यंत्रणांना सांगितले होते. जर हे लोक पकडले गेले नाहीत तर पुढे अनेक खून होतील आणि तसेच घडले. प्रशासन आणि तपास यंत्रणांनी तेव्हाच आमचे म्हणणे गांभीर्याने घेतले असते तर हे सर्व खून टाळता आले असते, अशी खंत हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा देखील खून थांबवता आला असता कारण त्यांच्या खून प्रकरणातील संशयित 2009 च्या एका बॉम्ब ब्लास्टमध्ये संशयित होते आणि त्यानंतर ते फरार होते असे आरोप हमीद यांनी केला आहे.
अजूनही मुख्य मास्टर माईंड मोकाट
मुक्ता दाभोळकर म्हणाल्या, चारही खुनांचा तपास महाराष्ट्राची एटीएस, महाराष्ट्र पोलीस, कर्नाटकाची सीआयडी कर्नाटकाची एसआयटी, आणि सीबीआय अशा पाच यंत्रणा करत आहे. या सर्वांनी मिळून 30 आरोपी पकडले आहे. त्यामध्ये डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणार्या आरोपींनाही पकडण्यात आले आहे. मात्र, अजून ही मुख्य मास्टर माईंड पकडलेले नाही.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या चार्जशिटमध्ये असे म्हटले आहे की, हे एका व्यापक दशतवादी कटाचे परिणाम आहे. एकानंतर एक असे चार खून झाले. परंतु या हत्येमागील मास्टरमाइंड अजूनही पकडला गेलेला नाही. हे चारही खून घडवण्यामागे चार ते पाच संघटनांचा आंतरराज्य गट कारणीभूत असून त्यांचे फ्रंट लाईन ऑपरेटर्स तुरुंगात आहेत मात्र मास्टरमाइंड पकडले गेलेले नाही हे गंभीर असल्याचे मुक्ता दाभोलकर म्हणाल्या.