(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News : तरुणांनो 'स्पोर्ट्स'ची नशा करा, द ग्रेट खलीचे तरुणाईला आवाहन; खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप
Nagpur News : नागपूर आणि महाराष्ट्रात असेच महोत्सवांचे आयोजन व खेळाडूंना सोयीसुविधा मिळत राहिल्यास, हे राज्यही भविष्यात 'नंबर वन' बनू शकते, अशी आशा खली यांनी व्यक्त केली.
Nagpur News : व्यसनांमुळे युवा पिढीवर परिणाम होतो. त्यामुळे आयुष्य बर्बाद होते. तरुणांना खरोखरच नशा करायची असेल तर ती 'स्पोर्ट्स'चा अर्थात खेळांची करावी, अशा शब्दांत WWEमधील वर्ल्ड हेविवेट चॅम्पियन द ग्रेट खली (The Great Khali) यांनी तरुणाईला आवाहन केले. धंतोली येथील यशवंत स्टेडियमवर पाचव्या खासदार क्रीडा महोत्सवाचा थाटात समारोप झाला. यावेळी केलेल्या जोशपूर्ण भाषणात खली यांनी ऐतिहासिक खासदार महोत्सवाचे आयोजन करून नागपूरकर युवा खेळाडूंना व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल गडकरी यांचे अभिनंदन केले. त्याचवेळी युवा खेळाडूंना मार्गदर्शनही केले. ते म्हणाले, गडकरींसारखा नेता मिळणे हे नागपूरकरांसह महाराष्ट्र व देशाचेही फार मोठे भाग्य आहे. गडकरींनी केवळ देशभरात चांगले रस्तेच तयार केले नाही तर, युवा खेळाडूंना महोत्सवाच्या माध्यमातून संधीही उपलब्ध करून दिली आहे.
भारतातील जागतिक दर्जाच्या रस्त्यांचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. ते पुढे म्हणाले, आजच्या स्थितीत हरियाणा भारतात क्रीडा क्षेत्रात अव्वल क्रमांकाचे राज्य आहे. जर नागपूर व महाराष्ट्रात असेच महोत्सवांचे आयोजन व खेळाडूंना सोयीसुविधा मिळत राहिल्यास, हे राज्यही भविष्यात 'नंबर वन' बनू शकते, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
15 दिवस चाललेल्या पाचव्या खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप सुप्रसिद्ध पार्श्वगायक अंकित तिवारीच्या लाईव्ह कॉन्सर्टने झाला. तरुणाईचा आवडता गायक असलेल्या अंकितने यावेळी अनेक लोकप्रिय हिंदी गाणे सादर करून नागपूरकरांची मने जिंकली. कार्यक्रमाला हजारो नागपूरकर रसिकांनी विशेषतः तरुणाईने मोठ्या संख्येने हजेरी लावून अंकितच्या प्रत्येक गाण्याला उत्स्फूर्त दाद दिली.
व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), खासदार डॉ. विकास महात्मे (Vikas Mahatme), आमदार प्रवीण दटके, माजी आमदार सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, सुधीर दिवे आदी होते. गडकरी यांनी महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल नागपूरकर खेळाडूंचे अभिनंदन केले. त्याचवेळी शहरात 300 खेळांची मैदाने विकसित करण्याचा तसेच यशवंत स्टेडियमचा पुनर्विकास करण्याचा संकल्प केला. यासाठी फडणवीस यांच्याकडून भरीव निधींची अपेक्षा केली. अंकितच्या लाईव्ह कॉन्सर्टने नागपूरकरांची मने जिंकली
पुरस्कार विजेते सन्मानित
यावेळी खली व अन्य मान्यवरांच्या हस्ते क्रीडा महर्षी व क्रीडा भूषण पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. यंदाचा क्रीडा महर्षीपुरस्कार द्रोणाचार्य व अर्जुन पुरस्कार विजेते विजय मुनीश्वर यांना देण्यात आला, तर 23 खेळाडूंना क्रीडा भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. क्रीडा महर्षी विजेत्यास रोख पाच लाख रुपये व सन्मानचिन्ह, तर क्रीडा भूषण विजेत्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले.
एका महिन्यात यशवंत स्टेडियमच्या पुनर्विकासाची परवानगी : फडणवीस
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारकडून अपेक्षा व्यक्त केल्यानंतर लगेच फडणवीस यांनी प्रतिसाद देत, यशवंत स्टेडियमच्या पुनर्विकासाच्या परवानगीची प्रक्रिया एक महिन्याच्या आत पूर्ण करण्याची घोषणा केली. याशिवाय शहरात 300 मैदाने विकसित करण्यासाठी राज्य सरकारकडून 100 कोटी देण्याचीही यावेळी घोषणा केली. तसेच मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात देखील आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
ही बातमी देखील वाचा...