Mahavitaran : विदर्भात वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम, तब्बल 52 कोटींच्या वीजचोऱ्या समोर
वीजचोरांची माहिती पुढे यावी, यादृष्टीने माहिती देणाऱ्यांना रोख स्वरूपात बक्षीसही दिले जात आहे. वीजचोरी होत असल्याचे लक्षात आल्यास ती महावितरणला द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
Nagpur News : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या महावितरणने वीजचोरांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. दीर्घ काळापासून सतत कारवाई सत्र सुरूच आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये विदर्भात एकूण 52 कोटींच्या वीजचोऱ्या उघडकीस आल्या. वीज चोरी व दंडाची रकम न भरणाऱ्या 98 वीज ग्राहकांविरुद्ध वीज कायद्यान्वये पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर प्रादेशिक विभागांतर्गत उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) यांच्या नेतृत्वात एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत विदर्भात सर्वदूर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात वीजचोरीची एकूण 1,273 प्रकरणे समोरी आली. ही वीजचोरी सुमारे 52.23 कोटींची असल्याचे तपासात निष्पन्न झाले. विद्युत कायदा 2003 सुधारित 2007 कलम मधील 135 अनव्ये 6.75 कोटी तर कलाम 126 व इतर प्रकरणामध्ये 45.48 कोटींची अनियमितता वीजचोरी पथकाने उघडकीस आणली. या कारवाईत 98 वीज ग्राहकांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली व उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) सुनील थापेकर यांच्या नेतृत्वात नागपूर विभागात मंडळ स्तरावरील 12 पथके आणि विभागीय स्तरावरील 3 भरारी पथके यांच्यावतीने वीजचोरीविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.
वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना बक्षीस
महावितरणने वीजचोरांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. चोरीमुळे होणारी वीज हानी थांबावी यासाठी कारवाईसोबतच अन्य उपाययोजनाही करण्यात येत आहे. वीजचोरांची माहिती पुढे यावी, यादृष्टीने माहिती देणाऱ्यांना रोख स्वरूपात बक्षीसही दिले जात आहे. वीजचोरी होत असल्याचे लक्षात आल्यास ती महावितरणला द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येत असल्याचे महावितरणने कळविले आहे.
अनेक अवैध कनेक्शनद्वारे 'मनी कलेक्शन'?
नागपूर शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणात असलेल्या दुकान आणि झोपडपट्टीमध्ये अवैध पद्धतीने वीज जोडणी केलेली आहे. कोराडी मार्गावरील स्टेडिमच्या बाजूला असलेल्या परिसरात आणि नॅशनल फायर इंजिनिअरिंग कॉलेजच्या भोवतीही अशा प्रकारे असलेल्या अवैध जोडणी दुरुनच दिसतात. मात्र याकडे कर्मचारी 'अर्थसंबंध' असल्यामुळे कानाडोळा करतात. तसेच या अवैध कनेक्शन द्वारे शहरात 'मनी कलेक्शन' तर होत नाही ना, अशी चर्चा वीज कर्मचाऱ्यांच्या वर्तुळात आहे.
महत्त्वाची बातमी