(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नागपूर हत्याकांड: एकाला संपवायचं होतं पण ५ जणांची हत्या केली, आरोपीची कबुली
राज्याला हादरवून टाकणाऱ्या पवनकर कुटुंबाच्या हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आरोपी विवेक पालटकर याला फक्त कमलाकर पवनकर यांची हत्या करायची होती.
नागपूर : राज्याला हादरवून टाकणाऱ्या पवनकर कुटुंबाच्या हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. आरोपी विवेक पालटकर याला फक्त कमलाकर पवनकर यांची हत्या करायची होती. मात्र, हत्याकांडासाठी आरोपीने लांब लोखंडी पहार वापरल्याने कमलाकर यांच्या शेजारी झोपलेल्या वेदांती आणि कृष्णा या दोन मुलांचाही यामध्ये मृत्यू झाला. दरम्यान अर्चना आणि नंतर मीराबाई या उठल्याने आरोपीनं त्यांचीही हत्या केली.
कमलाकर पवनकर हे आरोपीच्या मुलाचा सांभाळ करायचे. त्यासाठी कमलाकर विवेककडे सतत पैशाची आणि शेतीत हिस्सा देण्याची मागणी करत होता. याच रागातून हे हत्याकांड घडवल्याची कबुली आरोपीनं दिली आहे. दरम्यान, ११ जूनला झालेल्या या हत्याकांडानं नागपूरसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर आरोपी फरार झाला होता. नागपूर पोलिसांनी आरोपीला लुधियानातून अटक केली आहे.
काय आहे प्रकरण? नागपूरमध्ये 1 जूनला विवेक पालटकरने स्वत:च्या मुलासह बहीण, मेहुणा, सासू, भाची अशा पाच जणांची निर्घृण हत्या केली होती. कमलाकर पवनकर हे भाजपाचे कार्यकर्ते होते. हत्येनंतर आरोपी विवेक पालटकर पसार झाला होता.
कमलाकर पवनकर यांच्या घरी 10 जूनच्या मध्यरात्री हत्याकांडाचा थरार झाला होता. यात कमलाकर (45 वर्ष) यांच्यासह अर्चना पवनकर (पत्नी, वय 40 वर्ष), मीराबाई पवनकर (आई, वय 70 वर्ष), वेदांती पवनकर (मुलगी, वय 12 वर्ष, ), कृष्णा उर्फ गणेश पालटकर ( भाचा, वय 4 वर्ष) यांचा मृत्यू झाला.
घरातल्या मुख्य बेडरुममध्ये एकाच डबलबेडवर कमलाकर पवनकर, त्यांची पत्नी अर्चना पवनकर, मुलगी वेदांती पवनकर आणि कमलाकरच्या मेहुण्याचा मुलगा कृष्णा पालटकर या चौघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर वृद्धा मीराबाई पवनकर यांचा मृतदेह किचनमध्ये जमिनीवर होता. कमलाकर पवनकर हे भाजपचे पदाधिकारी होते. त्यामुळे यामागे राजकीय वैमनस्य असल्याची चर्चा होती. कमलाकर हे प्रॉपर्टी डीलरही होते, त्यामुळे आर्थिक वादातून झाल्याचीही शक्यता वर्तवली गेली.