एक्स्प्लोर
नागपुरात प्रेमसंबंधातून 30 वर्षीय तरुणाची हत्या

नागपूर : नागपुरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नाही. 30 वर्षीय युवकाच्या हत्येची घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून पंकज पाटील या तरुणाची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास कुंजीलाल पेठ परिसरात पंकजची हत्या करण्यात आली. पंकज रिक्षा चालवण्याचं काम करायचा. दोन वर्षांपूर्वी पंकजचे त्याच्या घराजवळच राहणाऱ्या एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र तिचं दुसऱ्या तरुणाशी लग्न झाल्यापासून दोघांमधला संपर्क तुटला होता. मंगळवारी तिच्या मुलाचा नामकरण सोहळा सुरु असताना पंकज पाटील कार्यक्रम स्थळापासून काही अंतरावर उभा होता. तरुणीचा भाऊ बंटी सुखदेवेने पंकजच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला असता दोघांमध्ये भांडणाला सुरुवात झाली. तेव्हा बंटी सुखदेवे, त्याचे वडील आणि इतर तीन सहकाऱ्यांनी मिळून पंकजवर हल्ला चढवला. चाकूने त्याच्यावर अनेक वार केले. त्यातच पंकजचा मृत्यू झाला. या प्रकरणात पाच आरोपी असून सर्वांचा शोध सुरु आहे.
आणखी वाचा























