(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एकीकडून सात लाखांचा हुंडा घेतला अन् लग्न दुसरीसोबत केलं, डॉक्टरच्या विरोधात परळीत फसवणुकीचा गुन्हा दाखल
बीड जिल्ह्यातील परळीमध्ये एका डॉक्टरने तुमच्या मुलीसोबत लग्न करतो असं सांगून एका व्यक्तीकडून सात लाख हुंडा घेऊन लग्न दुसऱ्या मुलीसोबत केल्याचा आरोप सदर व्यक्तीने केला आहे.
बीड : एकीकडून सात लाखांचा हुंडा घेऊन चक्क दुसऱ्या मुलीसोबत लग्न केल्याचा प्रकार एका डॉक्टरने केलाय. तुमच्या मुलीसोबत लग्न करतो, मला लातूरला हॉस्पिटल टाकण्यासाठी सात लाख रुपये द्या, असे म्हणून या डॉक्टरने परळीतील मुलीसाठी तिच्या कुटुंबीयांकडे मागणी घातली. मात्र, साखरपुडा झाला, हुंडा दिल्यानंतर त्याने परस्पर दुसऱ्याच मुलीशी लग्न केल्याच्या आरोपावरून डॉक्टरवर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आलाय.
परळी शहरातील सोमेश्वर नगरमध्ये राहणारे डॉ. संदीप वसंतराव मंत्रे हे सध्या लातूर जिल्ह्यातील साकोळ मधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. ज्या मुलीसोबत लग्न करण्याचे ठरले होते, त्या मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार गतवर्षी 18 सप्टेंबर रोजी संदीप त्यांच्या घरी आला. मी सध्या वैद्यकीय अधिकारी असून मला लातूरला हॉस्पिटल टाकण्यासाठी सात लाख रुपये द्या, मी तुमच्या मुलीशी लग्न करतो अशी त्याने मागणी घातली. मुलगा डॉक्टर आहे, स्वतः मागणी घालत असल्याने स्वतःच्या मुलीचे भविष्य चांगले होईल या आशेने वडिलांनी संदीप सोबत मुलीचे लग्न जमवले.
23 सप्टेंबर रोजी दोन्हीकडील काही मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत साखरपुडा झाला. 21 ऑक्टोबर रोजी मुलीच्या वडिलांनी ठरल्याप्रमाणे सात लाख रुपये संदीपच्या घरी नेऊन त्याच्या वडिलांकडे सुपूर्द केले आणि लग्न यावर्षी 5 मे रोजी करण्याचे ठरले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी लग्नाची जोरदार तयारी सुरु केली. मंगल कार्यालय बुक झाले, लग्नपत्रिका छापल्या, इतर सर्व साहित्य खरेदी केले.
इथपर्यंत सगळं काही सुरळीत सुरु होतं. मात्र, 23 मार्चपासून संदीपने त्याचा मोबाईल बंद केला. अखेर 4 एप्रिल रोजी संदीपने त्याचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न झाल्याचे व्हॉट्सॲपवर व्हिडीओ क्लिपमध्ये सांगून या लग्नास नकार दिला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून डॉ. संदीप मंत्रे याच्यावर परळी शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आलाय.
व्हिडीओद्वारे आरोप करून बदनामी करत असल्याचा डॉक्टरवर आरोप
सराईतपणे पैश्याची मागणी करून हा डॉक्टर शांत बसला नाही तर माझे लग्न झाल्याचे सांगूनही माझा पाठलाग करण्यात येत आहे, लग्नासाठी माझ्या कुटुंबावर दबाव आणत आहेत अशा आरोपांचा व्हिडीओ करून तो नातेवाईकांत पाठवून मुलीची आणि तिच्या वडिलांची बदनामी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या लग्नाचे नाटक करणाऱ्या डॉक्टर संदीपने हुंडा घेतलेल्या मुलीच्या कुटुंबियांना अंधारात ठेऊन दहा वर्षांपासून ओळख असलेल्या मुलीसोबत लातूर जिल्ह्यातील रायवाडी येथील मंदिरात लग्न केले. याच मुलीसोबत लग्न करण्याचे निश्चित असतानाही संदीपने माझ्या मुलीसोबत विवाह करतो, म्हणून सात लाख रुपये घेऊन फसवणूक केली असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.