MVA Seat Sharing In Maharashtra : ठाकरेंच्या मशालीने अवघा महाराष्ट्र व्यापला; तुतारीने मर्यादित जागा आखून घेतली अन् काँग्रेसची विदर्भावर मदार!
जागावाटपामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीने फुटल्यानंतरही शिवसेना ठाकरे गटाने सर्वाधिक जागा घेत बाजी मारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अप्पर हॅन्ड हा उद्धव ठाकरे यांचाच असणार आहे.
MVA Seat Sharing In Maharashtra : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. मात्र, जागावाटपानंतरही अजूनही कुरघोड्या सुरू आहेत का? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीकडून राज्यातील जागावाटप जाहीर करण्यात आले. महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागावाटपामध्ये शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारताना 21 जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. काँग्रेसकडून 17 जागांवर उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून 10 जागांवर उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. त्यामुळे जागावाटपामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीने फुटल्यानंतरही शिवसेना ठाकरे गटाने सर्वाधिक जागा घेत बाजी मारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अप्पर हॅन्ड हा उद्धव ठाकरे यांचाच असणार आहे.
महाराष्ट्रात सर्वदूर ठाकरेंकडून उमेदवार
आता जागावाटपानंतर कोण कोणत्या जागेवर लढणार यावर सुद्धा शिकामोर्तब झालं आहे. गेल्या काही दिवसापासून अत्यंत वादग्रस्त झालेल्या सांगली जागेवरचा दावा ठाकरे गटाने कायम ठेवताना त्या ठिकाणी चंद्रावर पाटील हेच उमेदवार असतील हे जागावाटपानंतर निश्चित झालं आहे. जागावाटपामध्ये ठाकरे यांनी अवघा महाराष्ट्र व्यापला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीनुसार विचार केल्यास महाराष्ट्रात ठाकरेंकडून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मुंबईमधील सहापैकी चार जागांवर ठाकरेंचे उमेदवार असणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने जागांमध्ये अधिक वाद न घालता मोजक्या जागांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दहा जागांवर उमेदवार दिले आहेत.
मुंबईतील जागावाटपावरून काँग्रेसची नाराजी
दरम्यान, ठाकरे गटाने जागा वाटपामध्ये बाजी मारल्यानंतर काँग्रेस नाराज असल्याची चर्चा आहे. मुंबईतील जागावाटपामुळे वर्षा गायकवाड नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी ही नाराजी काँग्रेसच्या उच्चस्तरीय नेतृत्वापर्यंत पोहोचवल्याची सुद्धा चर्चा आहे. भिवंडी जागा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला गेल्याने सुद्धा काँग्रेसच्या नाराजीमध्ये आणखी भर पडली आहे. मुंबईतील जी जागा पदरामध्ये पडली आहे त्या जागांवर आपण जिंकू शकत नसल्याचे मत काँग्रेसकडून व्यक्त करण्यात येत आहे. ज्या जागांवर आपण जिंकू शकलो असतो त्या जागा ठाकरेंच्या वाट्याला गेल्याचे म्हणणे काँग्रेसचे आहे.
सर्वाधिक मदार काँग्रेसची विदर्भावर
जागावाटपामध्ये सर्वाधिक चर्चा काँग्रेस आणि ठाकरे गटाचीच राहिली. या दोन्ही पक्षांकडून सातत्याने एकमेकांच्या जागांवरती दावा करण्यात आला. यामधूनच सांगली आणि भिवंडी आणि मुंबईमधील काही जागांचा वाद पेटला होता. मात्र, सांगलीची जागा ठाकरेंच्या वाटेला गेली आहे. भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे. यामुळे कोकण विभागातील एकही जागा काँग्रेसला मिळालेली नाही. त्यामुळे सर्वाधिक मदार काँग्रेसची विदर्भावर असणार आहे. काँग्रेसकडून विदर्भात 10 उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तीन जागांवर काँग्रेस रिंगणात असून यामध्ये कोल्हापूरच्या जागेचा समावेश आहे. उर्वरित महाराष्ट्राचा विचार केल्यास लातूर, नांदेड आणि जालना या ठिकाणी काँग्रेस रिंगणात असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या